पुणे: पुण्यात मंगळवारी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. मार्केटयार्ड परिसरात पावसाच्या पाण्यात फळे आणि भाज्या वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच फळ व तरकारी विभाग परिसरात गाळ्यासमोरून पाणी वाहत होते. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाल्याने व्यापाऱ्यांनी फळे फेकून दिली. शिवनेरी रस्त्यावर गुडघाभर पाणी रस्त्यावर साचले तर फळ विक्री करणाऱ्या गाळ्यासमोर पाणी साचून फळांचे नुकसान झाले.
मार्केटयार्डात शहरातून विविध भागातून फळ विक्रेते व व्यावसायिक ग्राहक खरेदीसाठी येत असतात. मात्र मंगळवारी १२ वाजेच्या सुमारास दोन तास मुसळधार पावसाने जोर धरला पीकअव्हर मध्ये पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे शिवनेरी रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. तर वाहनचालकांना येथून मार्ग काढणे अडचणी ठरले. शिवनेरी रस्त्यावर तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
मार्केटयार्ड परिसरातील तरकारी, फळ विभाग व कांदा-बटाटा विभाग गाळ्यासमोरून पाणीच पाणी झाल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. गाळ्यासमोर पाणी साचल्याने पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागला. बाजारातील चेंबरचे काम झाले नसल्याने आणि जुनीच लाइन असल्याने याठिकाणी थोडा पाऊस झाला की परिसरातील पाणीच पाणी होते. यामुळे बाजार समितीने याकडे लक्ष द्यावे. पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्यासाठी पावसाळी लाइन टाकणे गरजेचे आहे. - किशोर कुंजीर अध्यक्ष ‘फॅक्ट’