Video: जेजुरीत मुसळधार; पायऱ्यांवरून वाहू लागले धबधब्यासारखे पाणी, भाविकांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:39 IST2025-05-26T16:33:30+5:302025-05-26T16:39:49+5:30
जेजुरी गडाच्या पायरी मार्गावरून धो धो पाणी वाहत असल्याने भाविकांची मोठी तारांबळ उडाली होती, तर अनेकांच्या घरातही पाणी शिरले

Video: जेजुरीत मुसळधार; पायऱ्यांवरून वाहू लागले धबधब्यासारखे पाणी, भाविकांची उडाली तारांबळ
जेजुरी : जेजुरी पंचक्रोशी मध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग नागरिकांनी अनुभवली. ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात सुरू झालेला पाऊस क्रित्येक वर्षांनी नागरिकांनी अनुभवला. जेजुरी परिसरात सुमारे २१७मिलिमीटर पावसाची नोंद रविवारी (दि.२५) सायंकाळपर्यंत झाली होती.
जेजुरीत मुसळधार; पायऱ्यांवरून वाहू लागले धबधब्यासारखे पाणी, भाविकांची उडाली तारांबळ#Pune#jejuri#Rains#dampic.twitter.com/rgOEz3LPas
— Lokmat (@lokmat) May 26, 2025
सोमवारी (दि.२६) सकाळच्या सुमारास पावसाने उसंत घेतली होती सूर्यदर्शन झाले होते. मात्र हे वातावरण काही काळ टिकले, त्यानंतर दुपारी १ वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगफुटीसारखा पाऊस कोसळला. सलग अर्धा ते पाऊणतास झालेल्या पावसाने नाले व बंधारे भरले आहेत. जेजुरी गडाच्या पायरीमार्गावरून धो धो पाणी वाहत असल्याने भाविकांची मोठी तारांबळ उडाली होती. तर अनेकांच्या घरात ही पाणी शिरले. मोरगाव रस्त्यालगतच्या घरातून पाणी घुसल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली. नगरपालिकेने ताबडतोप उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांनी मागणी केली आहे.
राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता
रविवारी मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. यंदा नैर्ऋत्य मोसमी वारे १३ मे रोजीच अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांत मान्सून शनिवारी (दि. २४ मे) वेगाने केरळ व कर्नाटकात दाखल झाला. त्यानंतर वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करून रविवारी मान्सून गोव्यासह कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यात मान्सून साधारणपणे ७ जूनच्या दरम्यान दाखल होतो. परंतु यंदा २५ मे रोजीच सुमारे १२ ते १४ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा आणि देवगडपर्यंत भाग व्यापला. देवगड, बेळगावी, हावेरी, धर्मपुरी, चेन्नई आणि कोहिमा मार्गे मान्सून जात आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या मराठवाड्याच्या भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कोकण, गोव्यातील बहुतांश भागात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे