बारामतीत मुसळधार! ‘'काळजी करु नका, तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर', अजितदादांचा नागरिकांशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:18 IST2025-05-26T16:17:24+5:302025-05-26T16:18:08+5:30

आपत्तीच्या काळात नागरिकांना मदत करणे राज्य शासनाचे कर्तव्य असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अजित पवारांचे आदेश

Heavy rain in Baramati 'Don't worry your people representative is with you Ajit pawar interaction with citizens | बारामतीत मुसळधार! ‘'काळजी करु नका, तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर', अजितदादांचा नागरिकांशी संवाद

बारामतीत मुसळधार! ‘'काळजी करु नका, तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर', अजितदादांचा नागरिकांशी संवाद

बारामती: बारामती व इंदापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. ‘काळजी करु नका, तुमचा लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर आहे, आपत्तीच्या काळात नागरिकांना मदत करणे राज्य शासनाचे कर्तव्य असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, राष्ट्रीय आपत्ती कायद्यानुसार बाधित नागरिकांना मदत करण्यात येईल, असे आदेश यावेळी यांनी दिले.

बारामतीत रविवारी (दि २५) झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार उडाला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार राज्यातील सर्व कार्यक्रम रद्द करीत बारामतीत पोहचले. सोमवार(दि २६) पहाटेच पवार यांनी नुकसानग्रस्त भागाचा दाैरा सुरु केला. पवार यांनी सकाळी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ परिसरातील इमारती, कन्हेरी वनोद्यान, कन्हेरी काटेवस्ती येथील नीरा डावा कालवा, सोनगाव, ढेकळवाडी, इंदापूर तालुक्यातील सणसर, निंबोडी, शेटफळगढे, मदनवाडी आणि भिगवण येथील बसस्थानक परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्याकडून माहिती घेतली.

यावेळी ते म्हणाले, बारामती, इंदापूर आणि दौंड दोन्ही तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या अतिवृष्टीमुळे घराचे, पिकांचे, शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या भागातील नागरिकांची अल्पोपहार, जेवण आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावरील साचलेला गाळ काढण्याचे काम सुरु आहे. रस्त्यावरील खड्डे भरुन काढण्यासह परिस्थितीचा अंदाज घेऊन बंद असलेले रस्ते सुरु करण्यात येत आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळालेले परंतु या आपत्तीत घराचे नुकसान झालेल्या नागरिकांना विशेष बाब म्हणून घरकुल मंजूर करण्याबाबत विचार करण्यात येईल. एकही नागरिक बेघर राहणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. नागरी वस्तीमध्ये रोगराई पसरु नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधे फवारणी करावी. कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करावी. ओढ्यामधील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करुन ओढा रुंदीकरण, खोलीकरणाचे काम करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे. याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. सणसर परिसरातील बाजारपेठ विचारात घेऊन सेवा रस्ता तयार करावा, अशा सूचना  पवार यांनी दिल्या.

Web Title: Heavy rain in Baramati 'Don't worry your people representative is with you Ajit pawar interaction with citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.