पुणे: सोमवारी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी पुनश्च जोरदार हजेरी लावत शहर जलमय केले. सायंकाळपर्यंत ४२.५ मिमी. पावसाची नोंद भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे झाली. पुढील दोन दिवस शहरात पाऊस बरसणार असून, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानातून सुरू झाला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर झाला असून, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील पुण्यासह विविध शहरांमध्ये पावसाने धुव्वा उडवला आहे. गणेशोत्सव काळात उघडीप दिलेल्या पावसाने रविवारपासून पुनश्च हजेरी लावली असून, दोन दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारी दुपारनंतर पावसाने काहीशी उघडीप दिली होती. मंगळवारी दुपारी बारानंतर जोरदार पावसाला सुरू झाला. एक ते दोन तास पावसाने शहराला झोडपून काढले. रस्ते जलमय झाले होते. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. दुचाकीस्वारांनी पावसापासून बचाव करण्यासाठी उड्डाणपुलाचा आधार घेतला. वाहतूक संथ गतीने सुरू होती. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून गाडी चालविण्याची वेळ येत होती. तीनपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. सायंकाळनंतर अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. दरम्यान, पुढील दोन दिवस तरी पुणेकरांना सूर्याचे दर्शन घडणार नसून, शहरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कायम राहणार आहे. राज्यातून दि. ५ ऑक्टोबरपासून पाऊस माघारी फिरण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
पुण्यात मंगळवारी सायंकाळी ६:००पर्यंतचा पाऊस
शिवाजीनगर ४२.५पाषाण २३.२लोहगाव ३६