विदर्भ, मराठवाड्यात २ दिवस उष्णतेची लाट, राज्यात गुढीपाडव्याला पावसाची शक्यता

By नितीन चौधरी | Published: April 5, 2024 04:38 PM2024-04-05T16:38:39+5:302024-04-05T16:40:08+5:30

रविवारनंतर पुढील ४ दिवस ढगाळ वातावरण राहून विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता

Heat wave for 2 days in Vidarbha Marathwada chances of rain in Gudipadwa in the state | विदर्भ, मराठवाड्यात २ दिवस उष्णतेची लाट, राज्यात गुढीपाडव्याला पावसाची शक्यता

विदर्भ, मराठवाड्यात २ दिवस उष्णतेची लाट, राज्यात गुढीपाडव्याला पावसाची शक्यता

पुणे : उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णतेची लाट येणार आहे तर किमान तापमानातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तर सात तारखेनंतर पुढील चार दिवस ढगाळ वातावरण राहून विदर्भ मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात सध्या सूर्यदेव तळपायला सुरुवात झाली आहे. वातावरणातील खालच्या स्तरातील द्रोणिकारेषा मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातून थेट गोंदियापर्यंत पसरली आहे. यामुळे शनिवार व रविवार विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली व परभणी या जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान तापमानातही मोठी वाढ होऊन उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

याबाबत हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले, “त्यानंतर मध्य महाराष्ट्र व विदर्भात रविवारनंतर (दि. ७) उत्तरेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तसेच नांदेड हिंगोली जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होईल. या काळात अति हलका ते हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर सोमवारी व मंगळवारी राज्यात हलक्या पावसाची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.”

गुढीपाडव्याला पावसाचा अंदाज

पुणे व परिसरात कमाल तापमान सरासरी ३९ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर रविवारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मंगळवार सायंकाळनंतर गडगडाटासह सोसाट्याचा वार वाहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर दोन दिवस काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर गुढीपाडव्याला अर्थात ९ एप्रिल रोजी हलक्या पावसाची शक्यता जास्त असल्याचे काश्यपी यांनी सांगितले. तसेत शनिवारी व रविवारी पहाटे धुके पडण्याचा अंदाज आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Heat wave for 2 days in Vidarbha Marathwada chances of rain in Gudipadwa in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.