अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:16 IST2025-04-24T14:14:45+5:302025-04-24T14:16:38+5:30

पर्यटनाला गेलेल्या भावाचा आनंदी चेहरा पुन्हा पाहायला मिळणार नाही ही गोष्टच आम्ही अद्यापही स्वीकारू शकत नाही

He took care of us sisters with great difficulty the breadwinner of the family kaustubh Gunbote cousin was moved to tears | अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर

अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर

पुणे: कधीही कुटुंब आणि व्यवसाय सोडून भाऊ गेला नाही. इतक्या वर्षांनी आम्ही सगळे म्हणालो म्हणून फिरायला गेला आणि अचानक आम्हाला हल्ला झाल्याची वार्ता कळली. हे ऐकून पायाखालची जमीन सरकली आणि लगेच फोन लावला. त्याठिकाणी केवळ पोस्टपेड नेटवर्क असल्याने सुरुवातीला फोन लागला नाही. दुपारी समजलं की, तो जखमी आहे. नंतर समजलं त्याला एक गोळी लागली. त्यानंतर परत वार्ता आली की, त्याला दोन गोळ्या लागल्या. मात्र, अखेर रात्री ११ वाजता समजलं की, तो गेला... हे सांगताना कौस्तुभ यांच्या भगिनीला अश्रू अनावर झाले.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज भाजपकडून निषेध आंदोलन केले त्यामध्ये कौस्तुभ गनबोटे यांची चुलत बहीण डॉ. अर्चना देवधर सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या की, अत्यंत कष्टाने आम्हा बहिणींचा त्याने सांभाळ केला. परिवारातील कर्ता माणूस गेला. हे सांगताना कौस्तुभ गनबोटे यांच्या चुलत बहीण डॉ. अर्चना देवधर यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पर्यटनाला गेलेल्या भावाचा आनंदी चेहरा पुन्हा पाहायला मिळणार नाही ही गोष्टच आम्ही अद्यापही स्वीकारू शकत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टीतर्फे जम्मू-काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अलका टॉकीज येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी आमदार धीरज घाटे, शहराध्यक्ष धीरज घाटे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे, माजी नगरसेवक दीपक पोटे, प्रवीण चोरबेले, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात गनबोटे यांच्या चुलत बहीण डॉ. अर्चना देवधरदेखील सहभागी झाल्या होत्या.

डॉ. देवधर यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. मागील अनेक वर्षांपासून मोठ्या कष्टाने भावाने गनबोटे फरसाणचा घरगुती व्यवसाय उभा केला. व्यवसायाच्या निमित्ताने भावाला कधीही कुटुंबासमवेत बाहेर फिरता आले नाही. त्यामुळे आता निवांत फिरून ये असा आम्हीच आग्रह धरला आणि त्याची ही शेवटची ट्रिप ठरली. त्यांच्या कुटुंबावर आलेली परिस्थिती ही अत्यंत वाईट असून, यासाठी सरकार नक्की पावले उचलेल, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: He took care of us sisters with great difficulty the breadwinner of the family kaustubh Gunbote cousin was moved to tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.