वारंवार पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेताहेत; जगतापांना नोटीस देणार, अजित पवारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:32 IST2025-10-11T17:30:56+5:302025-10-11T17:32:39+5:30
त्यांना यापूर्वी मी समज दिली होती, त्यांनी सुधारणा करतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नाही

वारंवार पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेताहेत; जगतापांना नोटीस देणार, अजित पवारांची माहिती
पुणे : अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना यापूर्वी समज देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सुधारणा करतो, असा शब्द दिला होता. मात्र, त्यांच्यात सुधारणा झालेली नाही. ते वारंवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेत आहेत, त्यामुळे पक्ष त्यांना नोटीस देणार आहे, अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात दिली.
पुण्यातील वडगाव येथील नवले लॉन्समध्ये शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आ. संग्राम जगताप यांनी हिंदूंनी मुस्लिम व्यावसायिकांकडे खरेदी करू नये, असे वक्तव्य केल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका व ध्येय धोरण हे सर्व धर्म समभावाचे व सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाण्याचे आहे. अरुणकाका जगताप असताना सर्व काही सुरळीत सुरू होते. ते गेल्यावर मात्र, आ. संग्राम जगताप यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र गेले. त्यानंतर त्यांनी वेगळी भूमिका मांडण्यास सुरूवात केली. त्यांना यापूर्वी मी समज दिली होती. त्यांनी सुधारणा करतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नाही. त्यांनी मुस्लिम बांधवांबाबत असे बोलणे योग्य नाही. ते पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात बोलत असल्याने त्यांना लवकरच नोटीस दिली जाणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
आपण पक्षांतर केले, हे धंगेकर विसरलेत
माजी आमदार रवींद्र धंगेकर नीलेश घायवळ प्रकरणावरून भाजप नेत्यांवर टीका करत असल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, रवींद्र धंगेकर हे अजूनही काँग्रेसमध्ये आहोत, असे समजत आहे. त्यांनी पक्षांतर केले आहे, याचे भान त्यांना नाही. ते विसरले आहेत. ते आता शिवसेनेत आहेत. त्यांचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्यासह सर्वांनी युतीचा धर्म व युतीची नियमावली, याचे पालन करणे गरजेचे आहे. मित्रपक्षाचे भान सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.