सांगली, बीड, मुंबई, मुंब्रा, ठाणे, पुणे परिसरात लपला; २१ लाख चोरून पळालेला ३ महिन्यांनी सापडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 21:02 IST2025-07-30T21:01:58+5:302025-07-30T21:02:08+5:30
कारचालक म्हणून कामावर ठेवलेल्या कामगाराने कामगारांच्या पगाराचे २१ लाख रुपये चोरून ठोकली धूम

सांगली, बीड, मुंबई, मुंब्रा, ठाणे, पुणे परिसरात लपला; २१ लाख चोरून पळालेला ३ महिन्यांनी सापडला
पुणे: कामगारांच्या पगाराचे २१ लाख रुपये चोरून पळून गेलेल्या कार चालकाचा पोलिसांनी सतत तीन महिने मिरज, बीड, पुणे, मुंबई, मुंब्रा येथे शोध घेतल्यानंतर त्याला पकडण्यात काळेपडळ पोलिसांना यश आले आहे. सलमान यासीन पठाण (३२, रा. ईसा हाईटस, ठाणे, मुळ रा. पाली जि. बीड) असे या कार चालकाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून १५ लाख ६ हजार ४२० रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड, कार व मोबाईल फोन जप्त केला आहे.
याबाबत गिरीष अनिलचंद्र अग्रवाल (४७, रा. क्लोव्हर व्हिलेज, वानवडी) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्यांनी आठ दिवसांपूर्वी कारचालक म्हणून सलमान पठाण याला कामावर ठेवले होते. कामगारांना पगार देण्यासाठी त्यांनी आपल्या कारमध्ये बॅगेत २१ लाख रुपये ठेवले होते. ते एका क्लबच्या पार्किंगमध्ये २९ एप्रिल रोजी दुपारी चारच्या सुमारास ओळखीच्या व्यक्तीशी बोलत होते. त्यावेळी सलमान पठाण याने शेडखाली गाडी पार्क करतो, असे सांगून तो गाडी घेऊन तेथून निघाला. काही अंतरावर शेडखाली गाडी उघडी ठेवून पैशांची बॅग घेऊन पळून गेला होता. पळून गेल्यानंतर पठाण याने मोबाईल बंद ठेवला होता. या काळात तो मिरज -सांगली, बीड, पुणे ग्रामीण, मुंबई, मुंब्रा, ठाणे परिसरामध्ये लपवून वावरत होता. स्वत:चा मोबाईल न वापरता रस्त्यावरील अनोळखी व्यक्ती, रिक्षाचालक, कॅबचालक, हॉटेल वेटर व इतरांचा मोबाईलवरुन नातेवाईकांशी संपर्क करत असे. पोलिस तेथे पोहोचेपर्यंत तो तेथून पळून जात होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिस कर्मचारी प्रतीक लाहीगुडे यांनी आरोपीचे लोकेशन काढले. त्याअनुषंगाने तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे, पोलिस कर्मचारी दाऊद सय्यद, शाहिद शेख, प्रदीप बेडीस्कर यांनी सापळा रचून मुंब्रा येथील शिळडायघर पोलिस ठाण्याच्या परिसरात मित्राच्या मदतीने पकडले. चोरी केलेल्या मालापैकी १५ लाख रुपयांची रोख रक्क, सोन्याचे दागिने, कार आणि मोबाईल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचनेनुसार, सहायक निरीक्षक अमित शेटे, अंमलदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर आणि महादेव शिंदे यांनी केली आहे.