He did not attend the funeral While on duty, The police officer paid tribute by donating blood | ड्युटीवर असल्यामुळे अंत्यविधीला जाता आले नाही ; रक्तदान करून पोलिसाने वाहिली श्रद्धांजली

ड्युटीवर असल्यामुळे अंत्यविधीला जाता आले नाही ; रक्तदान करून पोलिसाने वाहिली श्रद्धांजली

ठळक मुद्दे सध्या समाजाची गरज म्हणून रक्तदान केल्याची भावना

चिंचवड : राज्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले असल्याने सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. चिंचवड येथे कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नातेवाईक वारल्याने त्यांना अंत्यविधीसाठी जाता आले नाही.म्हणून या अधिकाऱ्याने रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली.त्यांच्या या कार्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांचे मामा  हे सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक होते.त्यांचे सांगली जवळील विटा येथे आकस्मिक निधन झाले.मात्र त्यांच्या अंत्यविधी साठी जाधव यांना जाणे शक्य नव्हते.आपले आधारवड व मार्गदर्शक असणाऱ्या मामांचे निधन होऊनही आपल्याला जाता येत नाही ही खंत जाधव यांना जाणवत होती.मात्र त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण सध्या समाजाची गरज म्हणून रक्तदान केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.त्यांच्या या कार्याची दखल इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेत आज रक्तदान केले.पोलिसांनी केलेल्या या कार्याचे सर्वांनी कौतुक केले.
चिंचवड येथे भारतीय जैन संघटना, श्री काळभैरवनाथ उत्सव समिती ने शहरात आयोजित केलेल्या शिस्तबद्ध रक्तदान शिबिराला आज सुरवात झाली.गर्दी टाळण्यासाठी या मंडळांनी ऑन लाईन बुकिंग करण्याची व्यवस्था केली होती.या  योजनेत शहरातील ४५० रक्तदात्यांनी नाव नोंदणी केली आहे.विविध ठिकाणी सुरू केलेला हा उपक्रम ३१ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे.आज पहिल्या दिवशी विविध भागात १८० जणांनी रक्तदान करून समाजाप्रती आस्था असल्याची भावना व्यक्त केली.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात रक्तदात्यांनी दाखविलेल्या सहकार्याच्या भावाने बद्दल अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

----------------------
सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचे रक्तदान : चिंचवड स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे हे ३१ मार्च रोजी सेवा निवृत्त होत आहेत.आज पर्यंत समाजात राहून सेवा करण्याची संधी मिळाली. मात्र आता निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात रक्तदान करून समाजाचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळाल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.त्यांनी स्वतः आज रक्तदानाची सुरवात करून दिली.राज्यातील रक्तसाठा कमी असल्याने नागरिकांनी या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: He did not attend the funeral While on duty, The police officer paid tribute by donating blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.