अधिकाऱ्यांची कठोर भाषा निश्चितच अयोग्य; ‘एनडीए’मध्ये पत्रकारांशी गैरवर्तन दुर्दैवी - नौदलप्रमुख दिनेश त्रिपाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:59 IST2025-12-02T09:59:39+5:302025-12-02T09:59:55+5:30
पुढील काही दिवसांत संबंधित अधिकारी स्वतःहून माध्यम प्रतिनिधींना भेटतील, माध्यमांशी सौहार्दपूर्ण संबंध राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही ॲडमिरल त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांची कठोर भाषा निश्चितच अयोग्य; ‘एनडीए’मध्ये पत्रकारांशी गैरवर्तन दुर्दैवी - नौदलप्रमुख दिनेश त्रिपाठी
पुणे: खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) दीक्षांत संचलन सोहळ्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांशी झालेल्या गैरवर्तनाची नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी गंभीर दखल घेतली आहे. सदर घटना ‘दुर्दैवी’ असून, संबंधित अधिकाऱ्यांनी वापरलेली भाषा अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एनडीए अधिकाऱ्यांना माध्यमांशी संवाद साधून प्रकरण सौहार्दाने मिटवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित जनरल बी. सी. जोशी स्मृती व्याख्यानानंतर ॲडमिरल त्रिपाठी यांना अधिकृत निवेदन देत या प्रश्नाकडे लक्ष वेधले हाेते. त्यावर वृत्तपत्रांमधून मला या घटनेची माहिती मिळाली. यात काही अधिकाऱ्यांनी वापरलेली कठोर भाषा निश्चितच अयोग्य होती. पुढील काही दिवसांत संबंधित अधिकारी स्वतःहून माध्यम प्रतिनिधींना भेटतील. सदर मुद्दा चर्चा करून कायमस्वरूपी निकाली काढावा. माध्यमांशी सौहार्दपूर्ण संबंध राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही ॲडमिरल त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे श्रमिक पत्रकार संघाने या प्रकरणाची माहिती तिन्ही दलांच्या मुख्यालयांसह मुख्यमंत्री कार्यालयालादेखील रविवारीच पाठवली हाेती. या विषयावर लष्कराच्या वरिष्ठ पातळीवरून घेतली गेलेली तत्काळ दखल आणि संवादाच्या सूचनांमुळे हे प्रकरण सौहार्दपूर्वक मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.