बेकायदा सावकारी करणाऱ्या दोघांचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, वानवडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:03 IST2025-03-05T12:03:32+5:302025-03-05T12:03:49+5:30
व्याजाने पैसे परत करण्यावरून आरोपींनी तरुणाला त्रास देण्यास सुरुवात केली, तसेच फोन करून वेळोवेळी धमकीही दिली

बेकायदा सावकारी करणाऱ्या दोघांचा त्रास; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, वानवडीतील घटना
पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या दोघांच्या त्रासामुळे नैराश्यात असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घोरपडी येथील ढोबरवाडी भागात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून वानवडीपोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सचिन कट्टीमणी (रा.ढोबरवाडी, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन यांची आई येलक्का हनुमंता कट्टीमणी (वय ६१, रा.ढोबरवाडी, घोरपडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, स्टिव्हन नेगल, विजय इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, सचिन यांनी आरोपी स्टिव्हन आणि विजय यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. घेतलेले पैसे आणि व्याजाची रक्कम परत करण्यावरून आरोपींनी सचिन यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून वेळोवेळी धमकी दिली. त्यामुळे सचिन नैराश्यात होते. १ मार्च रोजी सचिन यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन यांची आई येलक्का यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. चौकशीत सचिन यांनी आरोपींनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक रियाज सय्यद तपास करत आहेत.