हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:43 IST2025-06-21T12:42:15+5:302025-06-21T12:43:34+5:30

पोलिसांनी आरोपी शुभम यादवच्या माहितीवरून मृतदेहाचा शोध घेतला असता, तो झाडीत बांधलेल्या अवस्थेत सापडला

Hands tied shirt tied around throat towel over face Young man body dumped in forest after murder | हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात

हात बांधलेले, शर्टने गळा आवळलेला, तोंडावर टॉवेल; खून करून तरुणाचा मृतदेह फेकला जंगलात

लोणावळा : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील आजिवली येथील ३५ वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह लोणावळ्याजवळच्या दुधीवरे गावाजवळ जंगलात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खून व पुरावे नष्ट करण्याच्या कारणाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादातून खुनाचा प्रकार घडला.

मृत व्यक्तीचे नाव हनिफअली सहाजमाल शेख उर्फ सोनू (३५) असून शुभम यादव (२५, रा. आपटी, ता. खालापूर), आशिष चव्हाण (२७, रा. डोणवत, ता. खालापूर), अमर मोरे (२२, रा. झाडानी, ता. खालापूर), एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हनिफअलीच्या पत्नीने १६ जूनला वावोशी पोलिस दूरक्षेत्रात बेपत्ताची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. हनिफअली हा शुभम यादव, अमर मोरे आणि आशिष चव्हाण यांच्यासोबत फिरण्यासाठी मुळशी येथे गेला होता. १७ जून रोजी सकाळी मुळशीतील गोशाळेच्या शेडमध्ये आशिष आणि हनिफअली यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेकांना लोखंडी हातोड्याने मारहाण केली. यानंतर, त्याच दिवशी दुपारी १ वाजता कारमध्येच चौघांनी मिळून शुभमचा टॉवेल आणि शर्ट वापरून हनिफअलीचा गळा दाबून खून केला. तसेच मृतदेह दुधीवरे गावाच्या खिंडीतील जंगलात फेकून दिला.

मृतदेह झाडीत बांधलेल्या अवस्थेत

पोलिसांनी आरोपी शुभम यादवच्या माहितीवरून मृतदेहाचा शोध घेतला असता, तो झाडीत बांधलेल्या अवस्थेत सापडला. त्याचे हात बांधलेले होते, शर्टने गळा आवळलेला व तोंडावर टॉवेल होता. घटनेचा तपास लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आवारे हे करत असून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंदवून कारवाई सुरू केली आहे.

Web Title: Hands tied shirt tied around throat towel over face Young man body dumped in forest after murder