पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मी सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा केली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगली सुधारणा झाली आहे, असे मत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. याच वेळी गोऱ्हे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे कायमच पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ओरडतात आणि त्यांना चिथावणी देण्याचे काम करतात, असेही नमूद केले.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात माहिती देण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. विधिमंडळ परिसरात आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पडळकरांमध्ये सुधारणा झाल्याचे मत व्यक्त केले. हाणामारीची सुरुवात पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून झाली, तेथे पडळकर उपस्थित होते, असा प्रश्न केल्यावर मात्र त्यांच्यात सभागृहामध्ये सुधारणा झाली, असे मला म्हणायचे आहे. सभागृहाबाहेर काय होते, त्यावर मी बोलत नाही. अगोदर चिथावणी द्यायची आणि मग ओरडायचे. गावातली भांडणं विधिमंडळात पोहाेचली, असेही त्या म्हणाल्या.
हनीट्रॅपसंदर्भात काँग्रेस नेते विजय वडट्टीवार यांनी केलेल्या आरोपावर गोऱ्हे म्हणाल्या, ज्या हनीकडे पुरावे आहेत, त्यांनी ते गृहमंत्र्यांकडे देऊन आरोप सिद्ध करावेत. उद्धव व राज ठाकरे एकत्र आले तरी आमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. भाजपचे लोक शिंदेंच्या मंत्र्यांना मुद्दाम लक्ष करत असल्याच्या आरोपात काही तथ्य नाही. शिंदे यांच्यामुळे भाजपचे अनेक आमदार निवडून आल्याचेही गोऱ्हे म्हणाल्या.
मुख्यमंत्री फडणवीस हिंदीसाठी आग्रही नाहीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेची सक्ती करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. ते हिंदीसाठी आग्रही नाहीत. यासंदर्भात त्यांच्यावर होणारे आरोप खोटे आहेत, तथ्यहीन आहेत, असेही गोऱ्हे म्हणाल्या.