गुड न्युज! यंदा लवकरच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पुण्यात १२, १३ व १४ जूनला मुसळधार पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:24 PM2021-06-10T21:24:56+5:302021-06-10T21:28:30+5:30

साधारणपणे १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पोहचतो. विदर्भात ५ दिवस अगोदर आगमन

Good news! Soon this year, the monsoon will cover the whole of Maharashtra, with yellow alerts for the Konkan and Vidarbha districts | गुड न्युज! यंदा लवकरच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पुण्यात १२, १३ व १४ जूनला मुसळधार पावसाची शक्यता

गुड न्युज! यंदा लवकरच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, पुण्यात १२, १३ व १४ जूनला मुसळधार पावसाची शक्यता

Next
ठळक मुद्देपुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी १२, १३ व १४ जूनला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे

पुणे: नैऋत्य मोसमी पावसाने गुरुवारी आणखी पुढे वाटचाल केली असून संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सून साधारणपणे १५ जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पोहचतो. यंदा त्याने ५ दिवस अगोदर महाराष्ट्र व्यापला आहे. मॉन्सून आज सुरत, नंदुरबार, बेतुल, मंडला, बिलासपूर, बोलांगीर, पुरीपर्यंत पोहचला आहे. 

उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत द्रोणीय क्षेत्र कायम असल्याने महाराष्ट्रातील कोकण तसेच गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्यात मुसळधार पाऊस पडला. कोकणात पुढील चार दिवस तसेच विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासात मुंबई (सांताक्रूझ) २३०, बेलापूर १७०, पनवेल १६०, उल्हासनगर १५०, कल्याण १४०, माथेरान १२०, भिवंडी, पालघर, उरण, वसई ११०, अंबरनाथ, रोहा १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील धुळे ९०, महाबेळश्वर ५०, ओझरखेडा ४०, एरंडोल, वेल्हे २० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील परभणी ७०, अंबड, परतूर ६०, परळी वैजनाथ ५० मिमी पाऊस झाला. 
विदर्भातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. घाटमाथ्यावरील लोणावळा (टाटा) १५०, ताम्हिणी ९०, डुंगरवाडी ८०, शिरगाव ७०, दावडी, खोपोली ६०, कोयना(पोफळी), अम्बोणे, वळवण, भिरा येथे ५०मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गुरुवारी दिवसभरात सांताक्रूझ ४७, कुलाबा १०, डहाणु ६१, महाबळेश्वर९, चंद्रपूर १२, अमरावती २६, गोंदिया १०, वर्धा ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी हलका पाऊस झाला आहे. किनारपट्टीवर द्रोणीय स्थिती कायम असल्याने पुढील चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील चार दिवस येलो अलर्ट देण्यात आला असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी १२, १३ व १४ जूनला हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

विदर्भातही मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भात आता मॉन्सून पोहचला असून बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील द्रोणीय स्थिती याचा एकत्रित परिणाम होऊन विदर्भातील गोंदिया, गडचिरोली,  नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोकण व विदर्भात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Good news! Soon this year, the monsoon will cover the whole of Maharashtra, with yellow alerts for the Konkan and Vidarbha districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.