पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 21:11 IST2025-08-30T21:10:37+5:302025-08-30T21:11:33+5:30

सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेले असता त्याने चाकूने हल्ला केला तेव्हा पोलिसांनी ही स्वसंरक्षणासाठी बंदुकीतून गोळी झाडली

Gold chain thief dies in police encounter Shocking incident in Shikrapur | पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना

पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये सोनसाखळी चोराचा मृत्यू; शिक्रापूरातील धक्कादायक घटना

कोरेगाव भीमा (पुणे): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण परिसरात सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची सराईत दरोडेखोर लखन उर्फ महेश पोपट भोसले (वय अंदाजे २५, रा. वडगाव पुसावले, ता. सातारा) याच्यासोबत शनिवारी (दि.३०) सायंकाळी चकमक झाली. या चकमकीत भोसलेने पोलिसांवर चाकूने हल्ला चढवला, त्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात भोसले जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे ग्रामीण, सातारा, सांगली यासह इतर ठिकाणी खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी अशा तब्बल ३५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यापूर्वी त्याच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली होती. २०२२ मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती. सध्या तो जामिनावर सुटका झाल्याने बाहेर होता आणि सातारा येथील एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांना तो हवा होता.

शनिवारी सायंकाळी लखन भोसले हा त्याच्या साथीदारासह शिक्रापूर येथील मलठण फाटा परिसरात नातेवाईकांकडे आल्याची खबर सातारा पोलिसांना मिळाली. त्यानुसार, साताराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या नेतृत्वाखालील पथक, ज्यात पोलीस हवालदार सुजित भोसले आणि तुषार भोसले यांचा समावेश होता, मलठण फाटा येथे दाखल झाले. पोलिसांना पाहताच भोसलेने चाकूने हवालदार सुजित भोसले आणि तुषार भोसले यांच्यावर हल्ला चढवला. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये भोसले गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी भोसले याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती जाहीर केली असून, त्याच्यावर दहीवडी, म्हसवड, वडगाव निंबाळकर, बारामती तालुका, इंदापूर आणि वडूज पोलिस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट केले.

लखन भोसलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी

लखन उर्फ महेश पोपट भोसले हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर ३५ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद होती, ज्यात खून, दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी यांचा समावेश आहे. त्याच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती, आणि २०२२ मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतरही तो गुन्हेगारी कृत्यांमध्ये सक्रिय होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गस्त वाढवली

या घटनेमुळे मलठण परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून, पुढील तपास सुरू आहे. लखन भोसले याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके स्थापन केली आहेत.

Web Title: Gold chain thief dies in police encounter Shocking incident in Shikrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.