'वेळप्रसंगी न्यायालयात जा...' चंद्रकांत पाटलांची अजित पवारांविरोधात संघर्षाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 09:09 AM2023-12-28T09:09:41+5:302023-12-28T09:09:54+5:30

अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांची कामे रद्द करण्याच्या कृतीवर या दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला आहे

'Go to court when the time is right...' Chandrakant Patal's stand against Ajit Pawar | 'वेळप्रसंगी न्यायालयात जा...' चंद्रकांत पाटलांची अजित पवारांविरोधात संघर्षाची भूमिका

'वेळप्रसंगी न्यायालयात जा...' चंद्रकांत पाटलांची अजित पवारांविरोधात संघर्षाची भूमिका

पुणे: जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)च्या निधीवाटपावरून भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते आता आणखी आक्रमक झाले आहेत. भाजपचे पदाधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांची बुधवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, तसेच पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. इतकंच नाही, तर सदस्यांनी निधी वाटपात आपल्याला सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रारही केली. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलणे टाळले असले, तरी त्यांनी अजित पवारांविरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे. इतकंच नाही, तर आक्रमक झालेल्या सदस्यांना वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी ठेवा, असा सल्ला दिल्याचेही सदस्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भाजपचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मावळमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमास आले होते. त्या ठिकाणी डीपीसीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनाही अजित पवारांनी निधी वाटपात केलेल्या कुरघोडी सांगितल्या. त्यानंतर, तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्किट हाउसवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. १९ मे रोजी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर केलेला आराखडा आणि त्यातील कामे बदलून परस्पर अजित पवार यांनी निधी वाटप केले. सर्वसाधारण १,०५६ कोटी रुपयातील ६५ टक्के निधी आमदार, दहा टक्के खासदार आणि आणि फक्त दहा टक्के निधी हा भाजप व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना देण्याचे नियोजन केले. अजित पवारांनी भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांची कामे रद्द करण्याच्या कृतीवर या दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतला असून, न्यायालयात दाद मागण्याची भूमिका जाहीर केली. बैठकीत अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली, तसेच १९ मे रोजी झालेल्या सभेचे प्रोसिडिंग अद्यापही सात महिने झाले, तरी आम्हाला मिळालेली नाही. नियोजन समितीची सभा झाली नसतानाही कामे मंजूर केली जात आहेत. ही एक प्रकारची मनमानीच असल्याचा आरोप भाजप सदस्यांनी अजित पवारांवर केला. इतकंच नाही, तर भाजप सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप नोंदवत एकूणच जिल्हा नियोजन समितीच्या कार्यपद्धती विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

अजित पवारांचे रिपोर्टिंग अमित शहांना

तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत भाजपच्या एका सदस्याने राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याशी झालेले संभाषणच सांगितले. सदस्य म्हणाले, डीपीसी निधी वाटपासंदर्भात अजित पवार यांच्याकडे त्यांच्या एका पदाधिकाऱ्याने विचारणा केली. तेव्हा त्यांनी मी इथल्या भाजपच्या कुठल्याही नेत्यांना रिपोर्टिंग करत नाही. मी फक्त दिल्ली अमित शहा यांना रिपोर्टिंग करेन, असे सांगितल्याचे या भाजप सदस्याने सांगितले. 

Web Title: 'Go to court when the time is right...' Chandrakant Patal's stand against Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.