'२ लाख दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करते', कोथरूडच्या 'त्या' महिलेवर आणखी एक गुन्हा दाखल
By किरण शिंदे | Updated: December 4, 2025 10:02 IST2025-12-04T10:02:29+5:302025-12-04T10:02:46+5:30
महिलेवर हा पहिलाच गुन्हा नसून कोथरूड पोलीस ठाण्यात आधीच तिच्यावर एक अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ४७ वर्षीय व्यक्तीलाही तिने अशाच प्रकारे ब्लॅकमेल केले आहे

'२ लाख दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करते', कोथरूडच्या 'त्या' महिलेवर आणखी एक गुन्हा दाखल
किरण शिंदे
पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या गौरी प्रल्हाद वांजळे (वय ३८) या महिलेवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील एका ३७ वर्षीय व्यक्तीसोबत आधी जवळीक वाढवत ब्लॅकमेल केल्याचा तिच्यावर आरोप आहे. माझ्याशी लग्न कर नाहीतर दोन लाख रुपये दे, अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन" अशी धमकी तिने दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या वरून मुंढवा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. ३०८(७) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे बी.टी. कवडे रस्त्यावरील घोरपडी परिसरात राहतात. वैवाहिक वादातून त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा आहे. याच प्रकरणात मदत करते, अशी बतावणी करत गौरी वांजळे हिने त्याच्याशी ओळख वाढवली. मी हायकोर्टात वकिली करते असे सांगत तिने त्याचा विश्वास संपादन केला. हळूहळू ही ओळख जवळिकीपर्यंत पोहोचली. दरम्यान, काही दिवसांनी गौरी वांजळे हिने थेट फिर्यादीला लग्नाची मागणी घातली. मात्र लग्नास नकार मिळाल्यावर तिने त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली.
१५ सप्टेंबर २०२५ पासून हा संपूर्ण प्रकार सुरू होता. लग्नासाठी नकार मिळाल्याने तिने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. फिर्यादीच्या आईच्या मोबाईलवर फोन करून सतत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. लग्न कर नाहीतर दोन लाख रुपये दे अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते अशी धमकी दिली. अखेर तीन महिन्यांपासून हा त्रास सहन करणाऱ्या फिर्यादीने शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर गौरी वांजळे हिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गौरी वांजळे हिच्यावर हा पहिलाच गुन्हा नाही. कोथरूड पोलीस ठाण्यात आधीच तिच्यावर एक अशाप्रकारचा गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील ४७ वर्षीय व्यक्तीलाही तिने अशाच प्रकारे ब्लॅकमेल केले. त्याच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. शेवटी ब्लॅकमेल करत त्याच्याकडेही पैशाची मागणी केल्याची तक्रारीत म्हटले होते. यावरून तिच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.