'उसने घेतलेले ४० हजार परत दे', असे म्हणून तरुणावर चाकूने केले सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 15:04 IST2021-06-27T15:04:46+5:302021-06-27T15:04:53+5:30
हडपसरमधील घटना, एकाच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

'उसने घेतलेले ४० हजार परत दे', असे म्हणून तरुणावर चाकूने केले सपासप वार
पुणे: उसने दिलेल्या पैशांपैकी शिल्लक राहिलेले पैसे लवकर परत देत नसल्याच्या कारणावरुन चाकूने तरुणावर सपासप वार करुन खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसरपोलिसांनी अकिल सय्यद (वय ४२, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी साबीर रशिद सय्यद (वय ३५, रा. सुरक्षानगर, वैदवाडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना वैदवाडीतील रेल्वे मार्गाच्या भिंतीजवळ २५ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती.
साबीर यांनी सय्यदकडून उसने पैसे घेतले होते. त्यापैकी ४० हजार रुपये परत करण्याचे राहिले होते. हे बाकी राहिलेले ४० हजार रुपये लवकरात लवकर पाहिजे, असे म्हणून त्याने चाकूने साबीर यांच्या छातीवर, पोटावर, गुप्तांगाच्या खाली व पाठीवर सपासप वार केले. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.