Pune Crime: मुलीचा विनयभंग; तरुणाला लुटले, महिलेची छेड, विवाहाच्या आमिषाने अत्याचार; पुण्यात गुन्हेगारीच्या ४ घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:04 IST2026-02-06T17:03:12+5:302026-02-06T17:04:05+5:30

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून विनयभंग, महिलांची छेडछाड, तोडफोड अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे

Girl molested; Young man robbed, woman molested, tortured with the lure of marriage; 4 incidents of crime in Pune | Pune Crime: मुलीचा विनयभंग; तरुणाला लुटले, महिलेची छेड, विवाहाच्या आमिषाने अत्याचार; पुण्यात गुन्हेगारीच्या ४ घटना

Pune Crime: मुलीचा विनयभंग; तरुणाला लुटले, महिलेची छेड, विवाहाच्या आमिषाने अत्याचार; पुण्यात गुन्हेगारीच्या ४ घटना

पुणे : घरासमोर खेळणाऱ्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या एकाविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रशांत काळे (३०, रा. राजमाता काॅलनी, कात्रज-कोंढवा रस्ता) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने येवलेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराची दहा वर्षांची मुलगी घरासमोर ४ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास खेळत होती. त्या वेळी आरोपी तेथे आला. त्याने मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तू मला आवडते, असे तो तिला म्हणाला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. आरोपीविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलिस उपनिरीक्षक महाडिक करत आहेत.

नगर रस्त्यावर तरुणाला लुटणारे चोरटे अटकेत

तरुणाला धमकावून लुटण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वडगाव शेरी परिसरात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. मोहम्मदअली युसुफअली जाफरी (२७) आणि अक्रम अबालु इराणी (२५, दाेघे रा. विष्णुकृपानगर, शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २८ वर्षीय तरुण विश्रांतवाडीतील मुंजाबा वस्ती परिसरात राहायला आहे. तो ४ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नगर रस्त्याने निघाला होता. वडगाव शेरीतील लष्कराच्या अग्निबाज डिव्हिजनच्या परिसरात तो थांबला. त्यावेळी आरोपी जाफरी आणि इराणी तेथे आले. येथे लघुशंका करण्यास मनाई असल्याचे सांगून त्याला धमकावले. त्याच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी हिसकावून दोघेजण पसार झाले. घाबरलेल्या तरुणाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी पसार झालेल्या दोघांना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राठोड करत आहेत.

महिलेची छेड काढणारा रिक्षा चालक अटकेत

महिलेची छेड काढणाऱ्या रिक्षा चालकाला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली. ख्वाजा नुरुद्दीन टिनमेकर (५४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय महिला येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातून निघाली होती. त्यावेळी रिक्षाचालक ख्वाजाने महिलेला अडवून तिची छेड काढली. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तो पसार झाला. महिलेने याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस कर्मचारी जाधव पुढील तपास करत आहेत.

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार करणाऱ्या एकाविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी ईश्वर अंकुश अवटे (वय ३५, रा. कृष्णानगर, महंमदवाडी) याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत एका ३३ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित महिला आणि आरोपीची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. आरोपीने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्याच्याकडे वेळोवेळी विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक बैरागी करत आहेत.

Web Title : पुणे अपराध: छेड़छाड़, लूट, उत्पीड़न, बलात्कार के मामले दर्ज

Web Summary : पुणे में अपराधों में वृद्धि: नाबालिग से छेड़छाड़, लूट, महिला का उत्पीड़न, और झूठे विवाह के वादे के तहत बलात्कार की सूचना। पुलिस जांच जारी है।

Web Title : Pune Crime: Molestation, Robbery, Harassment, Rape Cases Reported in Pune

Web Summary : Pune sees spike in crime: Molestation of minor, robbery, harassment of woman, and rape under false marriage promise reported. Police investigations underway.