Baramati: 'लग्न कर नाहीतर आई वडिलांचे मुंडके उडवीन', तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीचे टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 20:03 IST2025-04-11T20:02:39+5:302025-04-11T20:03:45+5:30
गावातील ४ नराधम वारंवार मुलीचा पाठलाग करणे, दमदाटी, धमकावणे अशा गोष्टी करत होते

Baramati: 'लग्न कर नाहीतर आई वडिलांचे मुंडके उडवीन', तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीचे टोकाचे पाऊल
वडगाव निंबाळकर (बारामती) : तू माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांचे मुंडके उडवीन अशी धमकी दिल्याने कोऱ्हाळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेल्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, १५ वर्षीय मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती. याच गावातील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे आपले साथीदार प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे, सुनील हनुमंत खोमणे हा गेल्या अनेक महिन्यांपासून मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. मेसेज वर धमक्या देत होता. माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना खल्लास करून टाकीन अशी धमकी देत होता. चारही आरोपी शस्त्र दाखवून मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते. आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग व दमदाटीला मुलगी कंटाळली होती.
सात एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या आधी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही. अशी धमकी दिल्याने मुलगी भयभीत झाली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड करत आहेत.