नीरा : नीरा (ता. पुरंदर) परिसरात गिलियन–बारे सिंड्रोम (GBS) या आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. उपचारादरम्यान ५० वर्षीय मन्सूर सय्यद यांचा मृत्यू झाला, तर ४६ वर्षीय कस्तुरी पटेल यांनी वेळेत उपचार घेतल्यामुळे पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्या आहेत. प्रशासनाने परिसरात सर्वेक्षण, पाणी तपासणी आणि आरोग्य उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नीरा (ता. पुरंदर) परिसरात गिलियन–बारे सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये काहीशी चिंता निर्माण झाली आहे. उपचारादरम्यान ५० वर्षीय मन्सूर रमजान सय्यद यांचा मृत्यू झाला, तर दुसरीकडे ४६ वर्षीय कस्तुरी पटेल या वेळेत निदान व उपचार मिळाल्यामुळे पूर्णपणे बऱ्या झाल्या असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मन्सूर सय्यद यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. जीबीएसच्या लक्षणांसह इतर आजारांची गुंतागुंत वाढल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे कस्तुरी पटेल यांना सुरुवातीच्या टप्प्यातच आजाराचे निदान झाल्याने तातडीने उपचार देण्यात आले आणि त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. जीबीएस हा मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार असून तो थेट संसर्गजन्य नाही. मात्र दूषित पाणी किंवा अन्नातून होणाऱ्या संसर्गानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर परिणाम करू शकते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे प्रशासनाने नीरा परिसरात पाणी स्रोतांची तपासणी, सॅनिटरी सर्व्हेलन्स आणि घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत सुमारे २,६०० पैकी २,००० घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून १९ खाजगी दवाखान्यांवर देखरेख ठेवण्यात आली आहे.
''नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जीबीएस हा वेळेत ओळखला आणि उपचार मिळाले तर पूर्ण बरा होऊ शकतो,” असे चंद्रकांत वाघमारे यांनी सांगितले.
"नागरिकांनी पाणी उकळून व गाळूनच प्यावे तसेच हातापायांना मुंग्या येणे, अशक्तपणा किंवा चालताना तोल जाणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा" असे आवाहन डॉ. हंकारे यांनी केले आहे.
दरम्यान, नीरा येथे २४ तास आपत्कालीन आरोग्य कक्ष सुरू ठेवण्यात आला असून रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
Web Summary : Purandar faces GBS concerns after two suspected cases. Sadly, one man died, but timely treatment helped a woman recover fully. Authorities are investigating water sources and conducting health surveys to prevent further spread. Citizens are urged to boil water and seek immediate medical attention if symptoms appear.
Web Summary : पुरंदर में जीबीएस के दो संदिग्ध मामले सामने आने से चिंता। एक व्यक्ति की दुखद मृत्यु, लेकिन समय पर इलाज से एक महिला पूरी तरह ठीक हो गई। अधिकारी जल स्रोतों की जांच और स्वास्थ्य सर्वेक्षण कर रहे हैं। नागरिकों से पानी उबालकर पीने और लक्षण दिखने पर तुरंत डॉक्टर से सलाह लेने का आग्रह किया गया है।