GBS Disease : रुग्णांची लूट झाल्यास कडक कारवाई करा..! अजित पवार यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:50 IST2025-01-31T11:49:29+5:302025-01-31T11:50:31+5:30
या आजाराच्या रुग्णांना मोफत उपचार द्यावेत, खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवावी

GBS Disease : रुग्णांची लूट झाल्यास कडक कारवाई करा..! अजित पवार यांचे आदेश
पुणे : शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या जीबीएस रुग्णांच्या संख्येवरून जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी (दि. ३०) झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय आमदारांनी नाराजी व्यक्त केली. या आजाराच्या रुग्णांना मोफत उपचार द्यावेत, खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट थांबवावी, अशी मागणी केली. त्याची दखल घेत पालकमंत्री अजित पवार यांनी खासगी रुग्णालयांकडून लूट होत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश दिले. महापालिकेने रुग्णांना मोफत उपचार द्यावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
यासंदर्भात खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, चेतन तुपे, विजय शिवतारे यांनी प्रश्न उपस्थित करून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या त्रुटींकडे लक्ष वेधले हाेते. सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक रुग्ण आढळल्याचे बैठकीत निदर्शनास आणून दिले. त्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सरकारी रुग्णालयांमध्ये न्यूरोलॉजी तज्ज्ञांची संख्या कमी असल्याकडे सुळे यांनी लक्ष वेधले. त्यावेळी महापालिका आयुक्तांनी कमला नेहरू रुग्णालयात आम्ही न्यूरोलॉजिस्ट नियुक्त केले आहे, अशी माहिती दिली.
एका रुग्णालयात ‘जीबीएस’संदर्भातील उपचार घेताना रुग्णाकडून जादा पैसे घेण्यात आले, असे सांगून आमदार चेतन तुपे यांनी पैसे वाढत असल्यामुळे उपचार नाकारण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात यावे. तसेच रुग्णांना विनामूल्य औषध उपचार द्यावेत, अशी मागणी केली हाेती.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये जीबीएस रुग्णांच्यासंदर्भात चांगले उपचार देण्यात यावेत. मोफत औषधे द्यावेत. खासगी रुग्णालयांतही मोफत उपचार दिले जावेत. उपचारासंदर्भात खासगी रुग्णालयाकडून रुग्णाला त्रास दिला जात असेल तर त्या रुग्णालयावर कारवाई करावी, असे निर्देश अजित पवार यांनी प्रशासनाला दिले.