Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:24 IST2025-11-01T17:23:25+5:302025-11-01T17:24:09+5:30
Pune Gang War: गुन्हेगाराने सलग गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
Pune Ganesh Kale Murder: कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात आज झालेल्या गोळीबारात एक तरुण ठार झाला. गणेश काळे असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर गुन्हेगारांनी सलग ६ गोळ्या झाडून आणि नंतर कोयत्याने वार करून हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक माहितीनुसार, गणेश काळे हा आंदेकर टोळीतील दत्ता काळे याचा भाऊ आहे. दत्ता काळे हा आयुष कोमकर हत्याप्रकरणातील आरोपी होता आणि त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही हत्या टोळीयुद्धाचा भाग असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. घटनास्थळी तात्काळ पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि कोंढवा पोलीस स्टेशनचे अधिकारी दाखल झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वनराज आंदेकरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा मास्टरमाइंड सोमनाथ गायकवाड व त्याचा साथीदार समीर काळे यांच्यावर आंदेकर टोळीचे बारकाईने लक्ष होते. आज समीर काळे यांचा भाऊ गणेश काळे हा खडी मशीन येथून येवलेवाडीकडे जात असताना भारत पेट्रोल पंपासमोर त्याच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार इसमांनी गोळ्या झाडून त्याची रिक्षातच हत्या केली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेबाबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे म्हणाले, गणेश काळे या तरुणावर दुचाकीवरून आलेल्या काही जणांनी गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी खडी मशीन चौकात घडली आहे. याबाबत पोलिसांकडून सर्व CCTV तपासले जात आहेत. घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण झाला असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार आहे. मयत गणेश काळे हा रिक्षा चालक असून, तो येवलेवाडी परिसरात राहणारा आहे. त्यांनी पुढे घटनेची सविस्तर माहिती देतांना सांगितले, आरोपी दुचाकीवर आले होते. यातील एक दुचाकी जागेवरच सापडली आहे. गणेश काळे याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा देखील दाखल आहे. ही घटना टोळीयुद्धाशी संबंधित आहे का ? याचा तपास सुरू आहे. आरोपींना शोधण्यासाठी दहा पथके रवाना केली आहेत. असेही शिंदे यांनी सांगितले.