मध्यप्रदेशातील चोरट्यांची घरफोड्या करणारी टोळी गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त
By नितीश गोवंडे | Updated: October 11, 2023 16:57 IST2023-10-11T16:57:15+5:302023-10-11T16:57:47+5:30
टोळी दिवसा रेकी करून रात्री घरफोड्या करण्याचे काम करत होती

मध्यप्रदेशातील चोरट्यांची घरफोड्या करणारी टोळी गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त
पुणे: सोसायटीतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या मध्यप्रदेशातील चोरांच्या टोळीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट ४ ला यश आले. पोलिसांनी या टोळीकडून ८ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून, घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.
मुकेश ग्यानसिंग भुरीया (२७), सुनिल कमलसिंह अलावा (२८), हरसिंग वालिसिंग ओसनिया (२२) आणि सुंदरसिंह भयानसिंह भुरिया (२५, सर्व रा. धार, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही परप्रांतीय टोळी मध्यरात्री सोसायटीच्या आवारात शिरायची, बंद फ्लॅटची पाहणी करून कटावणीने कुलूप तोडायची, आणि ऐवज चोरून पसार व्हायची. याप्रकरणी खडकी, येरवडा, विश्रांतवाडी आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होते. ही टोळी खडकीतील रेंजहिल्स परिसरात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ४ ला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून या चोरांना पकडले.
चोरांची ही टोळी घरफोडी करण्यासाठी मध्यप्रदेश येथून शहरात आली होती. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, कर्मचारी अजय गायकवाड, हरीष मोरे, प्रवीण भालचिम, सारस साळवी, अशोक शेलार, मनोज सांगळे आणि पथकाने ही कारवाई केली.
म्हणून नदी,नाल्यावाटे येऊन घरफोडी..
ही टोळी घरफोड्या करण्यात सराईत आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तसेच सीसीटीव्ही कॅमेर्यांपासून वाचण्यासाठी तसेच रात्री नदी-नाल्यात उतरण्याचे धाडस कोण करणार म्हणून त्यांनी नदी-नाल्यातून येण्याचा मार्ग निवडला होता. शिवाय जरी आपली कोणाला चाहूल लागली तरी पळून जाताना तेथूनच पळ काढायचे. ही टोळी दिवसा रेकी करून रात्री घरफोड्या करण्याचे काम करत होती.