‘फायटर’ कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; वानवडी पाेलिसांकडून ६ जण गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:58 IST2025-10-20T14:57:59+5:302025-10-20T14:58:12+5:30
पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली, त्यावेळी आरोपी कोंबड्यांची झुंज बघण्यासाठी आलेल्यांना पैसे लावण्यास सांगत होते

‘फायटर’ कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार; वानवडी पाेलिसांकडून ६ जण गजाआड, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे: घोरपडीतील एम्प्रेस गार्डनपासून काही अंतरावर मोकळ्या जागेत कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या सहा जणांना वानवडीपोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी झुंजीसाठी वापरण्यात आलेले सहा कोंबडे, पाच मोबाइल, तीन दुचाकी, पिशव्या, दोन हजार ५८० रुपये असा पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अमोल सदाशिव खुर्द (४७, रा. रविवार पेठ), मंगेश अप्पा चव्हाण (५५, रा. भवानी पेठ), निखील मनीष त्रिभुवन (२०, रा. घोरपडी), सचिन सदाशिव कांबळे (४२, रा. भवानी पेठ), प्रणेश गणेश पॅरम (२७, रा. लष्कर) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागणूक देणे अधिनियम कलम ११ (इ), (न) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोरपडीतील एम्प्रेस गार्डन परिसरातील एका बंगल्याजवळ असलेल्या माेकळ्या जागेत कोबड्यांची झुंज लावून त्यावर जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी गोपाळ मदने आणि अमोल पिलाणे यांना मिळाली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालायत हजार करण्यात आले. न्यायालायने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. त्यावेळी आरोपी कोंबड्यांची झुंज बघण्यासाठी आलेल्यांना पैसे लावण्यास सांगत होते. पोलिसांनी यावेळी सहा जणांना अटक करून झुंजीसाठी वापरण्यात आलेले सहा कोंबडे, पाच मोबाइल, तीन दुचाकी, पिशव्या, दोन हजार ५८० रुपये असा पाच लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयकुमार डोके, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमोले, अर्शद सय्यद, सुजाता फुलसुंदर यांनी केली.