गजा मारणे याला अटी शर्तीवर जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 22:47 IST2025-11-28T22:47:39+5:302025-11-28T22:47:55+5:30
कोथरूडमधील भेलकेनगर येथे मारणे टोळीतील सराईतांनी देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली होती.

गजा मारणे याला अटी शर्तीवर जामीन
पुणे : 'मकोका' गुन्ह्याच्या वैधतेबाबत उच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय होईपर्यंत गजा मारणेने पुणे महापालिका हद्दीत प्रवेश करू नये, कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी होऊन साक्षीदारांना धमकावू नये, अशा अटी- शर्तींवर एक लाख रुपयांच्या जातमुचलका व तितक्याच रकमेच्या हमीवर आरोपी गजानन मारणे याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी जामीन मंजूर केला. मारणेने अॅड. सुधीर शहा आणि अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
कोथरूडमधील भेलकेनगर येथे मारणे टोळीतील सराईतांनी देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली होती. त्याची गंभीर दखल घेत कोथरूड पोलिसांनी २५ फेब्रुवारी रोजी गजा मारणेला अटक केली. या प्रकरणी ३ मार्चपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या गजा मारणेचा पहिला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर मारणेने केलेल्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की या प्रकरणी तपास पूर्ण होऊन आरोपपत्र दाखल झाले असून, खुद्द तक्रारदारानेच प्रतिज्ञापत्र सादर करून आरोपी गजा मारणेचा गुन्ह्यातील सहभाग नाकारला आहे.
या गुन्ह्यात आर्थिक लाभाचा फायद्याचा कोणताही उद्देश दिसत नसल्याने 'मकोका' अंतर्गत दाखल गुन्ह्याबाबतही वाजवी शंका निर्माण होत असून, याबाबतची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या आधारावर न्यायालयाने गजा मारणे याची जामिनावर सुटका केली. न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहाबाहेर आल्यानंतर गजा मारणेने पोलिस आयुक्तालयात हजेरी लावली .