किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजित पवार यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 11:44 IST2025-02-20T11:43:46+5:302025-02-20T11:44:16+5:30
राज्य शासनाच्या वतीने किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर, आदी किल्ले परिसरांत विविध विकासकामे सुरू

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही; अजित पवार यांचे आश्वासन
जुन्नर : छत्रपती शिवाजी महाराजांचेगडकोट, किल्ले खऱ्या अर्थाने त्यांची दौलत आहे, ते आपले शक्तिस्थान, स्फूर्तिस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर, आदी किल्ले परिसरांत विविध विकासकामे सुरू आहेत, किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळ इमारतीत पारंपरिक पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते पाळणा हलवून शिवजन्मसोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांच्या जन्माचा पाळणा गायिला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व माॅं जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते माजी आमदार बाळासाहेब दांगट, डॉ. अमोल डुंबरे, जालिंदर कोरडे आणि राजाभाऊ पायमोडे यांना शिवनेर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यांसमोर ठेवून दूरदृष्टीने घेतलेला होता. त्यांनी सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोककल्याणाची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करूया. महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने, एकदिलाने काम करूया. शिवरायांची शिकवण आणि त्यांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल.
आमदार शरद साेनवणे म्हणाले, शिवनेरी व रायगड किल्ल्यांवर स्वराज्यध्वज लावण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला असता त्यांनी तातडीने त्याला होकार दिला. १९६० सालापासून प्रलंबित असलेला जुन्नर तालुक्यातील दाऱ्याघाटाच्या प्रश्नाला गती देण्याची मागणी, शिवनेरी किल्ल्यावरील रोपवे मार्ग, जुन्नर तालुक्यातून खेतेपठार तसेच बोरघरमार्गे भीमाशंकरला जोडणारा रस्ता, आंबेगव्हाण येथील बिबट सफारी पार्क, जुन्नर तालुक्यात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर पाच महाद्वार सीएसआर फंडातून उभे करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याचे आमदार सोनवणे यांनी यावेळी सांगितले.