कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार नाही, FTII कडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादी सुधारण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:55 IST2025-10-28T10:51:38+5:302025-10-28T10:55:02+5:30
एफटीआयआयच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप करण्याबरोबरच, विद्यार्थी संघटनेने १७ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाल्याचा देखील दावा केला होता

कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार नाही, FTII कडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादी सुधारण्याचा निर्णय
पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप करणाऱ्या एफटीआयआयविद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींशी सोमवारी (दि. २७) एफटीआयआय प्रशासनाची बैठक झाली. त्यानंतर, एफटीआयआयने गुणवत्ता यादीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून, कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द होणार नाही, असे निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
एफटीआयआयच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप करण्याबरोबरच, संघटनेने १७ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आरक्षण धोरणाचे उल्लंघन झाल्याचा देखील दावा केला होता. संघटनेने प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारादेखील दिला होता. त्यानंतर प्रशासनाने गुणवत्ता यादीमध्ये लिपिकीय त्रुटी असल्याचे मान्य केले. शुक्रवारी (दि. २४) सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली; परंतु त्या यादीतही त्रुटी आढळल्या. या पार्श्वभूमीवर सोमवारी विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधींशी प्रशासनाची बैठक झाली.
बैठकीनंतर एफटीआयआयने स्पष्टीकरण दिले की, प्रवेश परीक्षेची २०२४-२५ साठी १७ ऑक्टोबरला प्रथम प्रकाशित गुणवत्ता यादीचा आढावा घेण्यात आला आणि त्याची व्यापक समीक्षा व पडताळणी केल्यानंतर काही गणना-संबंधित विसंगती आढळल्या. त्यामुळे गुणवत्ता यादीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला.
प्रशासकीय संस्थांशी सल्लामसलत करून, पहिल्या प्रकाशित यादीतील त्रुटींमुळे चुकलेल्यांना योग्य दुरुस्ती करून, आधीच प्रवेश मिळालेल्यांचा प्रवेश रद्द न करण्याचा निर्धार करण्यात आला. १७ ऑक्टोबर रोजी प्रकाशित गुणवत्ता यादीतील सर्व मूळ निवडलेले उमेदवार सुधारित गुणवत्ता यादीतही निवडले गेले आहेत. या सुधारणा केल्यामुळे काही उमेदवारांच्या सापेक्ष गुणवत्तेच्या जागांमध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे निकाल आता पूर्णपणे सत्यापित आणि अचूक झाले आहेत आणि कोणत्याही उमेदवाराचा प्रवेश रद्द झालेला नाही.
तसेच, आरक्षणाबाबत भारत सरकारचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. भारत सरकारची एक संस्था आणि अभिमत विद्यापीठ म्हणून, एफटीआयआय सर्व प्रवेश-संबंधित प्रक्रियांमध्ये पारदर्शकता, निष्पक्षता आणि संस्थात्मक अखंडतेसाठी वचनबद्ध असल्याचे एफटीआयआयने दिलेल्या स्पष्टीकरणातून स्पष्ट केले आहे.