'वाईट' श्रेणी वरून 'मध्यम' वर; पुण्यात दिवाळीत ध्वनी प्रदूषणात वाढ, हवा प्रदूषणातील घट दिलासादायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 18:14 IST2025-10-24T18:13:43+5:302025-10-24T18:14:24+5:30
मागील वर्षी २१ ऑक्टोबरला हवा गुणवत्ता निर्देशांक २०१ अंकावर ('वाईट' श्रेणी) होता. यंदा तो १३२ ('मध्यम' श्रेणी) वर आला आहे

'वाईट' श्रेणी वरून 'मध्यम' वर; पुण्यात दिवाळीत ध्वनी प्रदूषणात वाढ, हवा प्रदूषणातील घट दिलासादायक
पुणे : दिवाळी सणाच्या काळात यंदा पुण्यात ध्वनीप्रदूषणात वाढ आणि हवेतील प्रदूषणात घट, अशी दोन वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती आढळून आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, पुणे शहरात काही भागांत ध्वनीप्रदूषण ९७ डेसिबलपर्यंत पोहोचले, तर पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र ५ ते १८ टक्क्यांपर्यंत घट नोंदवली गेली आहे.
मागील वर्षी २१ ऑक्टोबरला हवा गुणवत्ता निर्देशांक २०१ अंकावर ('वाईट' श्रेणी) होता, तर यंदा हवा तुलनेने स्वच्छ राहिली. मुख्य कारण फटाक्यांच्या वापरात घट आणि हवामानातील अनुकूल बदल अनुभन्यास मिळाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पहिला दिवशी दिवसा सरासरी ७५ डेसिबल, रात्री काही ठिकाणी ६९ डेसिबल पर्यंत. शिवाजीनगर, करव्हे रोड, स्वारगेट व शनीवारवाडा भागांत वाहतूक, फटाके आणि गर्दीमुळे आवाज वाढलेला दिसला. रात्री स्वारगेट व शनिवारवाडा मध्ये ३ते ५ डेसिबल वाढ, तर लक्ष्मी रोडमध्ये ७ डेसिबलनी घट नोंदविण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी (दि. २०) सहकार संकुल, कर्वे रोड, सातारारोड व शनीवारवाडा भागांत ९० ते ९७ डेसिबल पर्यंत आवाज नोंदवला गेला. दिवसा ३ ते ११ टक्के, रात्री २ ते ६ डेसिबल वाढ झाली. औंध, विद्यापीठ रोड व ससून परिसरात वाहनांच्या सायरन व फटाक्यांचा आवाज तीव्र होता. तिसऱ्या दिवशी (दि.२१ ) शिवाजीनगर, कर्वे रोड आणि जिजामाता रुग्णालय परिसरात उच्च ध्वनीपातळी. सरासरी ७९ ते ८१ डेसिबल, तर रात्री ८९ते ९४ डेसिबल पर्यंत आवाज नोंदविण्यात आला आहे.
या उलट पिंपरी-चिंचवडमध्ये जिजामाता हॉस्पिटल परिसरात दिवसा १६ टक्के घट, यमुनानगर-निगडी परिसरात १८.६ टक्के घट, आकुर्डी रुग्णालय परिसरात ५ टक्के घट नोंदवली गेली. फटाक्यांची मर्यादित विक्री, पोलिसांचा कडक बंदोबस्त व जनजागृती यामुळे ही घट शक्य झाली आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार निवासी भागात दिवसाची मर्यादा ५५ डेसिबल आणि रात्रीची ४५ डेसिबल. तथापि, स्वारगेट, सातारारोड, कर्वे रोड, शनीवारवाडा भागांत ही मर्यादा २० ते ३० डेसिबलने ओलांडली आहे. यंदाच्या दिवाळीत पुण्यात ध्वनीप्रदूषणात किंचित वाढ, तर हवेतील प्रदूषणात घट दिसून आली. पुणे शहरात वाहतूक आणि फटाक्यांचा अनियंत्रित वापर उच्च ध्वनीचे कारण, तर पिंपरी-चिंचवडमध्ये नियंत्रण आणि जनजागृती मोहिमेमुळे प्रदूषणात लक्षणीय घट झाली.
हवेतील प्रदूषण (हवा गुणवत्ता निर्देशांक)
दिनांक - हवा गुणवत्ता निर्देशांक - श्रेणी
१९ ऑक्टोबर - १५१ - मध्यम
२० ऑक्टोबर - १३५ - मध्यम
२१ ऑक्टोबर - १३२ - मध्यम
ध्वनी प्रदुषणाची आकडेवारी ( तक्ता)
विभाग - सरासरी (दिवसा) - रात्रीची पातळी - सर्वाधिक ध्वनी - बदल
पुणे - ७५ ते ८१ डेसिबल - ६८ ते ७५ डेसिबल - ९७.४ डेसिबल १ ते ५ टक्के वाढ
पिंपरी-चिंचवड - ६५–७४ डेसिबल - ५८ ते ६७ डेसिबल - ९०.१ डेसिबल ५ ते १८ टक्के घट