फॅमिली फ्रेंडचं घृणास्पद कृत्य; मित्राच्या मुलीला ६ वर्षापासून ब्लॅकमेल करत केला अत्याचार;गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 17:08 IST2025-08-17T17:07:55+5:302025-08-17T17:08:25+5:30
आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले. नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला.

फॅमिली फ्रेंडचं घृणास्पद कृत्य; मित्राच्या मुलीला ६ वर्षापासून ब्लॅकमेल करत केला अत्याचार;गुन्हा दाखल
पुणे - पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कुटुंबाचा जवळचा मित्र असलेल्या एका नराधमाने तब्बल सहा वर्षे आपल्या मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४४ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, २०१९ साली फिर्यादी जेव्हा केवळ १९ वर्षांची होती, तेव्हापासून हा अत्याचार सुरू झाला. आरोपी व फिर्यादीचं कुटुंब परस्परांच्या चांगल्या ओळखीचे असल्यामुळे आरोपी सतत फिर्यादीच्या घरात ये-जा करायचा. याचाच गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये फिर्यादी घरात कपडे बदलत असताना आरोपीने तिचे गुपचूप फोटो मोबाईलमध्ये टिपले. नंतर हे फोटो दाखवत ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याचा वापर करून तो वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार करू लागला.
दरम्यान, २०१९ पासून २०२५ पर्यंत या काळात अनेकदा धमकी देत त्याने तिच्यावर अत्याचार केले. घरात कोणी नसताना किंवा फिरताना, चारचाकीतून प्रवास करताना आरोपी तिच्या अंगाला स्पर्श करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. २०२० ते जुलै २०२५ दरम्यान आरोपीने वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या नराधमाच्या कृत्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने अखेर हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. रोज घरात वावरणाऱ्या व्यक्तीचं हे घृणास्पद वर्तन ऐकून कुटुंबीय स्तब्ध झाले. त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात करत आहेत.