Pune: हवाई दल जवानाच्या वेशात फोटो टाकून दिशाभूल करणाऱ्या तोतयाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 14:49 IST2025-05-19T14:48:38+5:302025-05-19T14:49:32+5:30

हवाई दलाच्या लढाऊ विमान तसेच मनाई असलेल्या ठिकाणांचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये मिळाले

Fraud in the guise of an Air Force personnel One person arrested from Pune | Pune: हवाई दल जवानाच्या वेशात फोटो टाकून दिशाभूल करणाऱ्या तोतयाला अटक

Pune: हवाई दल जवानाच्या वेशात फोटो टाकून दिशाभूल करणाऱ्या तोतयाला अटक

पुणे: पहलगामावरील हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर एअर फोर्समधील जवानाच्या वेशात लढाऊ विमानासमवेत फोटो असणाऱ्या आणि सोशल मीडियावर स्वत:ला एअर फोर्सचा जवान म्हणून मिरवणाऱ्या तोतयाला दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स, पुणे आणि खराडी पोलिसांनीअटक केली आहे. गौरवकुमार दिनेशकुमार (२५, रा. वरद विनायक अपार्टमेंट, थिटे वस्ती, खराडी, मुळ रा. अलिगड, उत्तर प्रदेश) असे या तोतयाचे नाव आहे.

पोलिसांनी त्याच्या घर झडतीत एअर फोर्सचे दोन टी-शर्ट, एक आर्मी कॉम्बॅट पँट, एअर फोर्स शूज, दोन बॅजेस, एक एअर फोर्सच्या ट्रॅक सूट वरील जर्कीन असे साहित्य जप्त केले आहे. हवाई दलाचा सुट एक महिन्यापूर्वी जाळून टाकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. गौरव कुमार हा खराडी येथील स्टे बर्ड हॉटेलमध्ये कामाला आहे.
याबाबत पोलिस हवालदार रामदास भोनाजी पालवे यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हॉटेलमध्ये काम करणारा एक इसम एअर फोर्सचा ड्रेस घालून वावरत असल्याची माहिती मिळाली. तसेच, सोशल मीडियावर तो नागरिकांना आपली खोटी ओळख सांगून त्यांची दिशाभूल करत असल्याची माहिती दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्सला मिळाली. त्यांनी याबाबत खराडी पोलिसांना कळवताच, पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. त्यावेळी या तोतयाच्या घरात एअर फोर्सशी संबंधित साहित्य मिळाले.

त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये विविध लढाऊ विमानांसोबतचे फोटो, एअर फोर्सचा परमेश्वरन हॉल व इतर ठिकाणी काढलेले फोटो मिळून आले आहेत. गौरव कुमार हा गेल्या एक वर्षापासून पुण्यात एकटा राहत असल्याची माहिती समोर आली आहे. २०२० मधील एक ओळखपत्रही त्याच्याकडे मिळून आले आहे. त्याने हा सर्व प्रकार का केला, याचा यामागे काय हेतू होता, याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.

Web Title: Fraud in the guise of an Air Force personnel One person arrested from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.