तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपमध्ये; राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 19:21 IST2026-01-07T19:21:31+5:302026-01-07T19:21:40+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पदावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते

तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपमध्ये; राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर
बारामती : राष्ट्रवादी काॅंग्रेस च्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बारामती तालुका राष्ट्रवादी काॅंंग्रेसचे माजी अध्यक्ष संभाजी होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होळकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. इंदापुर नगर परिषदेच्या राजकारणातून तत्कालिन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपची वाट धरली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री पवार यांनी गारटकर यांच्या जागी त्यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या होळकर यांच्यावर महत्वाच्या चार तालुक्यांची जबाबदारी दिली आहे.
होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती केली. होळकर यांच्या खांद्यावर बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अनेक वर्षापासून ते उपमुुख्यमंत्री पवार यांच्यासोबत पक्ष संघटनात काम करीत आहेत. पक्षफुटीच्या काळातही त्यांनी अजित पवार यांना साथ देण पसंत केलं. होळकर हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पदी देखील सध्या कार्यरत आहेत. तसेच त्यांनी यापुर्वी जिल्हा परीषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सभापती म्हणुन देखील काम पाहिले आहे. होळकर यांनी जवळपास तेरा वर्षांहून अधिक काळ बारामती तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडून तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला होता. मात्र गारटकर यांनी इंदापुरच्या राजकीय नाराजीतून जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत बंडखोरी केली. त्यामुळे पुणे जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पदावर कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संभाजी होळकर यांना महत्वाची जबाबदारी दिली आहे.