भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन; येरवडा कारागृहात असताना त्रास, ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 18:27 IST2025-12-26T18:25:46+5:302025-12-26T18:27:13+5:30
आजारपणामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी शिवाजीनगर न्यायालयात सादर केला होता, शुक्रवारी त्या अर्जावर सुनावणी होणार होती

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी यांचे निधन; येरवडा कारागृहात असताना त्रास, ससूनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू
पुणे: भाजपचे माजी नगरसेवक व सदाशिव पेठेतील निनाद नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक उदय त्र्यंबक जोशी (६३) यांचे शुक्रवारी सकाळी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ठेवीदारांची ५ कोटी ४३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या उदय जोशी यांची येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. जोशी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आजारपणामुळे त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांनी शिवाजीनगर न्यायालयात सादर केला होता, शुक्रवारी त्या अर्जावर सुनावणी होणार होती. त्यांना जामीन मिळण्याची शक्यता असतानाच सुनावणीपूर्वीच उपचादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
उदय जोशी हे पुणे महापालिकेमध्ये भाजपचे 1997 ते 2002 पर्यंत नगरसेवक होते. जोशी यांच्या पत्नी शुभदा जोशी यादेखील भाजप नगरसेविका होत्या. त्यांनी सदाशिव पेठेत निनाद नागरी सहकारी पतसंस्था सुरु केली. जोशी यांच्या मुलाने सिंहगड रोड परिसरात गॅस वितरण एजन्सीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पैसे घेतले होते. मात्र पैसे घेतल्यानंतर परतावा न दिल्याने ठेवीदारांची ५ कोटी ४३ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी उदय जोशी, त्यांचा मुलगा मयूरेश यांच्यासह सात जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध चार गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर याप्रकरणी त्यांना अटक करून त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
गेले काही दिवसांपासून ते आजारी होते. येरवडा कारागृहातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीखाली त्यांच्यावर कारागृहात उपचार सुरू होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. शुक्रवारी सकाळी जोशी यांना कारागृहात श्वास घेण्यास त्रास झाला. त्यानंतर कारागृह प्रशासनाने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे ससून रुग्णालयात निधन झाले. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे निश्चित कारण समजू शकेल, अशी माहिती येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी दिली.