प्रारूप मतदारयादी उद्या जाहीर, नागरिकांना हरकती नोंदविता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 02:39 AM2018-08-31T02:39:49+5:302018-08-31T02:40:57+5:30

The format voter will be announced tomorrow | प्रारूप मतदारयादी उद्या जाहीर, नागरिकांना हरकती नोंदविता येणार

प्रारूप मतदारयादी उद्या जाहीर, नागरिकांना हरकती नोंदविता येणार

Next

पुणे : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत नोंदणी झालेल्या मतदारांसह प्रारूप मतदारयादी शनिवारी (दि. १) जाहीर करण्यात येणार आहे. नागरिकांना येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत हरकती नोंदविता येतील. त्यानंतर सुधारणेसह अंतिम मतदारयादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण, नव्याने निर्माण केलेल्या मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षांना देण्यात आली. तसेच अगामी निवडणुकांसाठी मतदान केंद्रस्तरीय मध्यस्ताची (बीएलए) नियुक्ती करण्याचे आवाहनही राजकीय पक्षांना करण्यात आले. त्यासाठीच्या अर्जाचे वाटपही या वेळी झाले.

प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरील दावे अंतिम हरकती ३१ आॅक्टोबरपर्यंत स्वीकारण्यात येतील. या दाव्यांवरील सुनावणी ३० नोव्हेंबरपूर्वी घेण्यात येईल. त्यानंतर सुधारणेसह अंतिम यादी ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून नव्याने प्राप्त झालेल्या ईव्हीएम यंत्रणांची चाचणी राजकीय प्रतिनिधींच्या समोर घेण्यात येईल. यंत्र व्यवस्थित काम करीत असल्याची खात्री या वेळी करण्यात येईल. निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य केले आहे. त्यामुळे दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांच्या अडचणींचा विचार करण्यात येणार आहे. त्या अडचणींवर उपाययोजना करण्यात येतील. अधिकाधिक दिव्यांगांनी मतदान करावे, यासाठी दिव्यांगांच्या संस्थांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा दिव्यांग समिती स्थापन करण्यात आली असून, त्याच्या सदस्य सचिवपदी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात साडेसात हजार मतदानकेंद्र निश्चित
जिल्ह्यात या पूर्वी ७ हजार ५३४ मतदान केंद्र होती. त्यात १३२ मतदानकेंद्रांची भर पडली असून, ही संख्या ७ हजार ६६६ झाली आहे. या मतदानकेंद्रांची यादी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना देण्यात आली.

Web Title: The format voter will be announced tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.