आधी पाकिस्तान जिंदाबाद, नंतर भारत माता की जय; पुण्यातील 'त्या' तरुणाने अखेर मागितली माफी
By किरण शिंदे | Updated: March 9, 2026 15:24 IST2026-03-09T15:24:10+5:302026-03-09T15:24:20+5:30
“माझ्याकडून चूक झाली आहे, मला माफ करा. मला देखील भारतावर प्रेम आहे,” असे म्हणत त्याने “भारत माता की जय” अशी घोषणा देत झालेल्या प्रकाराबद्दल तरुणाने माफी मागितली.

आधी पाकिस्तान जिंदाबाद, नंतर भारत माता की जय; पुण्यातील 'त्या' तरुणाने अखेर मागितली माफी
पुणे : पुण्यात एका तरुणाने पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओनंतर अनेकांनी संताप व्यक्त करत संबंधित तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुण “चल, पाकिस्तान जिंदाबाद… काय करायचं ते कर… हिंदुस्तान जिंदाबाद नाही म्हणत” असे बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर झाल्यानंतर पुण्यात वातावरण तापलं आणि या घटनेवरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. या घटनेच्या निषेधार्थ काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करत संबंधित तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान प्रकरणाची दखल घेत पुणे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान व्हिडिओमधील तरुणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. अमन मुल्ला असे या तरुणाचे नाव असून तो अवघ्या 20 वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे. तो फॅब्रिकेशनचे काम करत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी पौड परिसरात एका ठिकाणी काम करत असताना अमन मुल्लाने पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले होते. त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याने हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. पर्वती पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत संबंधित तरुणाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली.
दरम्यान पोलिस कारवाईनंतर या तरुणालाही आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने आपल्याकडून चूक झाल्याची कबुली देत माफी मागितली. “माझ्याकडून चूक झाली आहे, मला माफ करा. मला देखील भारतावर प्रेम आहे,” असे म्हणत त्याने “भारत माता की जय” अशी घोषणा देत झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. पर्वती पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.