तोडणीला आलेल्या उसाला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; लोणी काळभोरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 18:09 IST2025-12-23T18:08:45+5:302025-12-23T18:09:13+5:30
प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी. तर पोलीस प्रशासनाने आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

तोडणीला आलेल्या उसाला आग; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; लोणी काळभोरमधील घटना
लोणी काळभोर : ग्रामपंचायत लोणी काळभोर हद्दीतील रायवाडी परिसरात तोडणीला आलेल्या ५ एकरहून अधिक क्षेत्रातील ऊसालाआग लागल्याची घटना मंगळवारी (ता. २३) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली असून या आगीत शेतकऱ्यांचे १० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तोडणीला आलेला ऊस आगीत जळून नुकसान झाल्याने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. लोणी काळभोर (ता. हवली) ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी परिसरात माजी सरपंच भरत काळभोर, दत्तात्रय आबु काळभोर, भगवान लक्ष्मण काळभोर, प्रभाकर आबू काळभोर, सचिन भगवान काळभोर, अशोक गेनबा गोते, गोविंद गोते अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी येथे शेतात या शेतकऱ्यांनी ऊसाच लागवड केली होती. सोमवार पासून ऊस तोड केण्यासाठी कामगार आले होते व एक ट्रक्टर ऊस सुद्धा गेला होता. काही नागरिकांना सुरवातीला अशोक गोते यांच्या ऊसाला आग लागल्याचे पाहिले. त्यानंतर ती आग शेजारील शेतकऱ्यांच्या ऊसाला लागली. बघता बघता ५ एकरहून अधिक ऊस अर्ध्या तासाच्या आत जाळून खाक झाला. नुकसान ग्रस्त शेतकरी लवकरच याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहेत. प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी. तर पोलीस प्रशासनाने आग लावणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.