येवलेवाडीत सोफा कारखान्याला आग, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:44 IST2024-12-14T13:43:26+5:302024-12-14T13:44:28+5:30
सोफा बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात दोन गॅस सिलिंडर आणून ठेवलेले होते.

येवलेवाडीत सोफा कारखान्याला आग, एकाचा मृत्यू
कोंढवा : येवलेवाडी येथील सोफा बनविण्याच्या कारखान्याला आग लागून एक कामगार गंभीर भाजला गेला. उपचासाराठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. हरुण हमद खान, (वय ४५, रा. येवलेवाडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोंढवा- येवलेवाडी रस्त्याच्या नजीक येवलेवाडी येथे शगीर पाशा असे दुकानमालकांचे नाव आहे. त्यांनी हा गाळा भाडेतत्त्वावर दिला होता. त्यामध्ये सोफ्याचा कारखाना सुरू करण्यात आला होता.
सोफा बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात दोन गॅस सिलिंडर आणून ठेवलेले होते. सिलिंडर या ठिकाणी का आणले होते त्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. त्या सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे कारखान्याला आग लागल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली असली तरी कारखान्यातील कामगारांनी त्याला दुजोरा दिला नाही. तर कारखान्यात वेल्डिंगचे काम सुरू असल्याने त्याच्या ठिणग्या उडून आग लागली असल्याची माहिती काही जणांनी दिली. मात्र, आगीचे कारण निश्चित पुढे आलेले नाही.
आग लागली त्यावेळी पाच कामगार कारखान्यात होते. त्यांनी धावत पळत जीव बाहेर पडून आपला जीव वाचविला, मात्र, पाचवा कामगार आत अडकला आणि आगीमध्ये तो गंभीर भाजला गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द येथील अग्निशामक दलाच्या गाड्या व एक वाॅटर टँकर यांनी सुमारे एक तासात आग आटोक्यात आणली.
कोंढवा मिठानगर येथे ही ट्रान्स्फॉर्मरला आग
कोंढवा, मिठानगर येथे दुपारी दोन वाजता इमारतीच्या आवारातील इलेक्ट्रिक ट्रान्स्फॉर्मरने पेट घेतला होता. आगीचा वेग वाढत चालला होता. सदरील घटनेची माहिती कोंढवा खुर्द येथील अग्निशमन वाहन दलाला प्राप्त होताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी आगीवर वेळेत नियंत्रण मिळवत पुढील धोका टाळला. अग्निशामक दलाच्या जवानांनी घेतलेल्या काळजीमुळे या घटनेत कोणीही जखमी नाही.