दौंड तालुक्यातील चौफुला येथे हॉटेलला आग; तब्बल एक कोटींचे नुकसान, जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:50 IST2025-07-23T09:50:44+5:302025-07-23T09:50:52+5:30
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे

दौंड तालुक्यातील चौफुला येथे हॉटेलला आग; तब्बल एक कोटींचे नुकसान, जीवितहानी टळली
केडगाव: दौंड तालुक्यातील सोलापूर हायवेवरील चौफुला येथील हॉटेल रघुनंदन येथे आग लागल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल मध्यरात्रीच्या सुमारास, अंदाजे सव्वादोन वाजता लागलेल्या या आगीत सुमारे एक कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
आगीच्या ज्वाला प्रचंड होत्या. आत मध्ये असलेले हॉटेल कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले. त्यांना वेळीच जागे केल्यामुळे पटकन बाहेर काढता आले. त्यामुळे जीवित हानी टळली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले, परंतु तोपर्यंत हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते. हॉटेलचे मालक रघुनाथ सरगर यांनी सांगितले की, मोठ्या परिश्रमातून हॉटेल सुरु केले होते. या अचानक उद्भवलेल्या घटनेने अनेक वर्षांच्या कष्टावर पाणी फिरले गेले, मोठा आर्थिक फटका बसला आहे. या आगीत हॉटेलमधील सर्व मौल्यवान फर्निचर आणि आतील सर्व शोभेच्या वस्तूंसह संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे. अधिक तपास यवत पोलीस करीत आहे.