भाचीला अपघातात आर्थिक मदत; १ महिना मुलीचा हप्ता थकला, बाउन्सरकडून घरात शिरून मारहाण
By नितीश गोवंडे | Updated: March 28, 2025 17:43 IST2025-03-28T17:43:18+5:302025-03-28T17:43:53+5:30
मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा १ महिन्याचा हप्ता भरता न आल्याने एकाला घरात शिरून मारहाण करण्यात आली

भाचीला अपघातात आर्थिक मदत; १ महिना मुलीचा हप्ता थकला, बाउन्सरकडून घरात शिरून मारहाण
पुणे : खासगी वित्तीय संंस्थेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्याने घरात शिरून बाउन्सरने एकाला मारहाण केल्याची घटना वानवडी भागात घडली. याप्रकरणी वानवडीपोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली. आकाश पुरुषोत्तम सापा (३२, रा. भवानी पेठ) आणि ऋषिकेश नागनाथ चंदनशिवे (२६, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खासगी वित्तीय संस्थेचा व्यवस्थापक हर्षद जिमन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वानवडीतील शांतीनगर भागात राहायला आहेत. तक्रारदार हे स्वत: बँकेतील कर्जप्रकरणे मार्गी लावण्यासाठी मध्यस्थी करतात. त्यासाठी त्यांना कर्जदार, तसेच बँकेकडून काही मोबदलाही मिळतो. तक्रारदाराने मुलीच्या शिक्षणासाठी सात लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज शिवाजीनगर भागातील एका खासगी वित्तीय संस्थेकडून घेतले होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर रकमेतून विम्यापोटी ४३ हजारांची रक्कम कापून घेण्यात आली. कर्ज मंजुरी प्रक्रिया शुल्क कापून घेण्यात आले. त्यांच्या खात्यात सहा लाख ८५ हजार रुपये जमा करण्यात आले. दरमहा १८ हजार ७० रुपये हप्ता ठरविण्यात आला. त्यानंतर त्यांनी नियमितपणे २४ हप्ते भरले. दरम्यान, त्यांच्या १७ वर्षीय भाच्याचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांनी काही आर्थिक मदत बहिणीला केली.
औषधोपचारासाठी पैसे दिल्याने त्यांचा एक महिन्याचा हप्ता थकला. २ मार्च राेजी त्यांनी हप्ता भरला नाही. त्यानंतर २५ मार्च रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला. हप्ता थकल्याने त्यांना शिवीगाळ करून धमकावण्यात आले. त्यानंतर ते २६ मार्च रोजी स्वत: शिवाजीनगर भागातील वाकडेवाडीत असलेल्या वित्तीय संस्थेच्या कार्यालयात गेले. हप्ता का थकला, याबाबतचे कारणही त्यांनी दिले. गुरुवारी (दि. २७) सायंकाळी तक्रारदार आणि त्यांचा भाऊ घरात होता. त्यावेळी दोनजण त्यांच्या घरात आले. आम्ही खासगी वित्तीय संस्थेतून आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी तक्रारदाराने त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगितले. दोघांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. थकलेल्या हप्त्याची रक्कम घेतल्याशिवाय जाणार नाही, असे सांगून दोघांनी तक्रारदार आणि त्यांच्या भावाला मारहाण केली.
त्यानंतर तक्रारदाराने पोलिस नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसंनी चौकशी केली. तेव्हा मारहाण करणाऱ्या बाउन्सरने खासगी वित्तीय संस्थेतील व्यवस्थापक हर्षद जिमन याच्या सांगण्यावरून आल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. मारहाण केल्याप्रकरणी दोघांनी अटक करण्यात आली असून, व्यवस्थापक जिमन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली. सहायक फौजदार साबळे तपास करत आहेत.