Devendra Fadnavis: अखेर मुहूर्त मिळाला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचे आज सायंकाळी उदघाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:44 IST2025-08-20T11:43:42+5:302025-08-20T11:44:14+5:30
राजभवनहून शिवाजीनगरकडे येणारी एकच बाजू उद्यापासून सुरू होणार आहे. अन्य काम अद्याप शिल्लक असून, ते पूर्ण व्हायला अजून दोन ते तीन महिने लागतील

Devendra Fadnavis: अखेर मुहूर्त मिळाला! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्यापीठ चौक उड्डाणपुलाचे आज सायंकाळी उदघाटन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला अखेर बुधवारचा मुहूर्त मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि. २०) सायंकाळी ७:०० वाजता या पुलाचे उदघाटन होईल. राजभवनहून शिवाजीनगरकडे येणारी एकच बाजू उद्यापासून सुरू होणार आहे. अन्य काम अद्याप शिल्लक असून, ते पूर्ण व्हायला अजून दोन ते तीन महिने लागतील.
शहरातील वाहतूक कोंडीने वाहनधारकांच्या त्रासाची परिसीमा झाली आहे. दररोज वाहनकोंडी होत आहे. या कोंडीवर उपाय म्हणून शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. त्यांच्या बांधकामामुळे वाहनधारकांच्या त्रासात भर पडत आहे. त्यामुळेच उड्डाणपुलाचा जेवढा भाग पूर्ण होईल तो त्वरित सुरू करावा, अशी मागणी होत असते. विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाची त्यामुळे बुधवारपासून एकच बाजू सुरू होईल. राजभवनहून शिवाजीनगरकडे येणाऱ्या बाजूचे उदघाटन करण्यात येत आहे. राजभवनशिवाय औंध व पाषाणकडे याच उड्डाणपुलाच्या दोन दुसऱ्या बाजूही जातात. त्या बंद आहेत. दोन ते तीन महिन्यांनंतर त्या सुरू करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शिवाजीनगर हिंजवडी मेट्रो मार्गाच्या खांबांच्या मधून बांधलेला हा शहरातील दुसरा उड्डाणपूल आहे. नळस्टॉप चौकात असा पहिला पूल बांधण्यात आला. तो लहान आहे. विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल मात्र बराच मोठा आहे. या पुलाआधी याच रस्त्यावर मेट्रोचे खांब नव्हते. मात्र, उड्डाणपूल होता. मेट्रोच्या खांबांना अडथळ होत होता. त्यामुळे कोरोना टाळेबंदीच्या काळात तो पाडण्यात आला. त्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर आधी मेट्रोच्या खाबांचे व त्यानंतर या पुलाचे काम सुरू झाले. खासगी विकासकाच्या माध्यमातून पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या नियंत्रणाखाली हे काम सुरू आहे.
खासगी कंपनीने काम घेतलेले असूनही त्यांच्याकडून कामाला गती मिळत नव्हती. नागरिकांच्या दबावामुळे स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडून कामाची गती वाढवण्याची मागणी केली जात होती. त्यातून उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम पूर्ण झाले. त्यामुळे जेवढा भाग झालाय तेवढा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली जात होती. ती मिळत नसल्याने पुलाची एक बाजू पूर्ण होऊनही ती सुरू करण्याला विलंब होत होता. त्यावरून राजकीय पक्षांकडून टीका होऊ लागली. त्यामुळे आता अखेर मुख्यमंत्र्यांकडून या बाजूचे उदघाटन होत आहे.
सार्वजनिक हित लक्षात घेऊन उड्डाणपूल किंवा अशी कामे त्वरित सुरू करून देणे गरजेचे असते. मात्र, ‘काम शिल्लक आहे’, असे कारण दाखवत, प्रत्यक्षात मात्र राजकीय व्यक्तींच्या वेळेसाठी म्हणून काम बंद ठेवण्याचा, अशा कामांच्या उदघाटनाचे ‘इव्हेंट’ करण्याचा प्रकार पुण्यात जोर धरत आहे. सार्वजनिक कामांमधून राजकीय फायदा घेण्याच्या या प्रकारांवर नागरिकांकडून टीका केली जात आहे.