अखेर ‘माळेगांव’च्या निवडणुकीचे बिगुल वाजलं; अजित पवार अन् गुरुशिष्यांचे मनोमिलन होणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:53 IST2025-05-16T11:49:35+5:302025-05-16T11:53:53+5:30
‘छत्रपती पॅटर्न’ची ‘माळेगांव’मध्ये राबविणार असल्याची चर्चा

अखेर ‘माळेगांव’च्या निवडणुकीचे बिगुल वाजलं; अजित पवार अन् गुरुशिष्यांचे मनोमिलन होणार का?
बारामती - छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा प्रचार अंतिम टप्यात आलेला असतानाच राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाने अखेर माळेगांव सहकारी साखर कारखान्याचा निवडणुक कार्यक्रम जाहिर केला आहे.त्यामुळे आता इंदापुर पाठोपाठ बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.फेब्रुवारी २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुशिष्यांची जोडी म्हणुन ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या ताब्यातून २१ पैकी १७ जागा जिंकत राष्ट्रवादीचा पाच वर्षानंतर झेंडा फडकवला होता .यंदा उपमुख्यमंत्री पवारांच्या रणनीतीसह गुरुशिष्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१५ च्या निवडणुकीत माळेगाव कारखाना आणि माळेगाव बुद्रूक ग्रामपंचायतीवरील राष्ट्रवादीचा झेंडा खाली उतरविण्यात राष्ट्रवादी विरोधी गटाला यश आले होते. एकूण २१ जागांपकी १५ जागा जिंकून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली होती.मात्र, २०२० मध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरु शिष्याच्या जोडीला टक्कर देण्यासाठी राजकीय फिल्डिंग लावून २०१५चा वचपा काढत १७ जागांवर विजय मिळविला होता.तसेच यंदा २०२५ मध्ये भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी बेरजेचे राजकारण केले.कोट्यावधींचे कर्ज असणारा छत्रपती कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सभासद केंद्रबिंदु मानत उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधक असणार्या पृथवीराज जाचक यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपविली.त्यामुळे अनेक वर्षांपासूनचा पवार जाचक यांच्यातील राजकीय दुरावा संपुष्टात आला.या पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री पवार चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्याशी हातमिळवणी करीत ‘छत्रपती पॅटर्न’ राबविणार,कि गुरुशिष्यांविरोधात शड्डु ठोकणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकसभा,विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळत दोघा गुरुशिष्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना राजकीय मदत करण्याची भुमिका घेतली होती.त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत यंदा तावरे गुरुशिष्य कोणती भुमिका घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
माळेगांव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी बुधवार (दि २१) पासुन अर्ज दाखल करण्यात सुरवात होणार आहे.२७ मे अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.२८ मे रोजी दाखल अर्जाची छाननी केली जाइल.२९ मे ते १२ जुन या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल.१३ जुन रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहिर केली जाणार आहे.२२ जुन रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल.त्यानंतर २४ जुन रोजी मतमोजणी होणार आहे.राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहिर केला आहे.
शरद पवार,सुप्रिया सुळे यांच्या भुमिकेकडे देखील लक्ष....
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाने सुरवातीला पृथवीराज जाचक यांना पाठींबा जाहिर केला.मात्र, पक्षाच्या एकाही पदाधिकारी,कारत्कर्त्याला उमेदवारी मिळाली नाही.त्यामुळे नाराज झालेल्या शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ‘छत्रपती’च्या निवडणुकीत तटस`थ राहण्याची भुमिका जाहिर केली.मात्र, राज्यात लक्षवेधी ठरणार्या माळेगांव कारखाना निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कोणती राजकीय भुमिका घेणार?यावर कारखाना निवडणुकीचे रण एेन पावसाळ्यात तापणार आहे.