पुण्यातील राष्ट्रीय कबड्डीपटूच्या खूनप्रकरणी अंतिम युक्तिवाद पूर्ण, आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 19:42 IST2025-10-10T19:27:56+5:302025-10-10T19:42:59+5:30
तब्बल २२ वार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशी दिल्यास समाजासमोर एक वेगळा आदर्श घातला जाईल.

पुण्यातील राष्ट्रीय कबड्डीपटूच्या खूनप्रकरणी अंतिम युक्तिवाद पूर्ण, आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी
पुणे : फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षीमध्ये आरोपीने १५ वर्षांच्या मुलीचा गळा चिरून खून केला. ती मेली आहे, हे माहिती असून सुद्धा काही वेळाने पुन्हा तिच्यावरती चाकूने व कोयत्याने २२ वार केले. त्यामुळे अशा क्रूर व्यक्तीला कोणतीही दयामाया देण्यात येऊ नये. आरोपीला फाशीची शिक्षा दिल्यास संपूर्ण समाजासमोर एक वेगळा आदर्श घातला जाईल. त्यामुळे आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली आहे.
पुण्यातील बिबबेवाडी येथील यश लॉन्स येथे १२ ऑक्टोबर २०२१ रोजी १५ वर्षांची राष्ट्रीय कबड्डी खेळाडू असलेल्या अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेमातून आरोपी शुभम ऊर्फ ऋषिकेश भागवत याने निर्घृण खून केला होता. या प्रकरणी पुण्यातील जिल्हा न्यायालयात विशेष सरकारी वकील हेमंत झंजाड यांनी शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात अंतिम युक्तिवाद केला. अंतिम युक्तिवादामध्ये इतर सर्व साक्षीदारांची साक्ष व उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्या निकालाचे न्यायनिवाडे सरकारी पक्षाच्यावतीने न्यायालयात सादर करण्यात आले. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या खटल्याचा निकाल काय लागेल? आरोपीला काय शिक्षा होईल, कुटुंबाला न्याय मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.