दिवंगत सराफी व्यावसायिक मिलिंद मराठे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 16:22 IST2021-03-12T16:21:23+5:302021-03-12T16:22:52+5:30
स्कीममध्ये गुंतवणूक करण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार

दिवंगत सराफी व्यावसायिक मिलिंद मराठे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : दुकानाच्या स्कीममध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित असून, कोणतीही फसवणूक होणार नाही असे आमिष दाखवित ग्राहकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून मुदतपूर्व ठेव रक्कम आणि परतावा न देता चार जणांची 1 कोटी 5 लाख 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नामांकित सराफी व्यावसायिक मिलिंद मराठे यांच्यासह कुटुंबातील पाच जणांविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मिलिंद मराठे उर्फ बळवंत अरविंद मराठे यांनी व्यवसायातील मंदी तसेच आर्थिक नुकसानीमुळे १५ डिसेंबर २०२० रोजी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती.
मिलिंद मराठे, कौस्तुभ अरविंद मराठे, मंजिरी कौस्तुभ मराठे, नीना मिलिंद मराठे आणि प्रणव मिलिंद मराठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शुभांगी विष्णू कुटे ( शिवतीर्थनगर, कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठे ज्वेलर्सच्या लक्ष्मी रस्ता आणि पौड रस्ता कोथरूड अशा दोन ठिकाणी शाखा आहेत.
मिलिंद मराठे आणि कौस्तुभ मराठे या भावांनी फिर्यादी यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र मुदतपूर्व ठेव रक्कम आणि परतावा न देता 37 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली तसेच फिर्यादीची नातलग शीतल कडूस ( रा.सोलापूर रोड हडपसर) यांची 25 लाख रुपये तसेच फिर्यादी यांना माहिती मिळाल्यानुसार अनंत हनुमंत दामले आणि सुरेखा अनंत दामले यांची 43 लाख रुपये अशी एकूण 1 कोटी 5 लाख 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी मराठे ज्वेलर्सच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.