कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं, दहशत; चंद्रकांतदादा करतात काय? धंगेकरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 17:49 IST2025-10-01T17:48:22+5:302025-10-01T17:49:48+5:30
कोथरूड आणि गुन्हेगारी आता पुणेकरांना नवीन नाही आणि याच्यामध्ये जे पाठीशी घालतात ते राज्यकर्ते आहेत

कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं, दहशत; चंद्रकांतदादा करतात काय? धंगेकरांचा सवाल
पुणे: पुण्यात गुन्हेगारी वाढत असून भरदिवसा खून, दरोडा, तोडफोड करून दहशत अशा घटना घडू लागल्या आहेत. कुख्यात गुंड आंदेकर, घायवळ, मारणे यांच्या टोळीतील गुंडांकडून दहशत पसरवली जात आहे. पुणेकर सद्यस्थितीत जीव मुठीत धरूनच घराबाहेर पडू लागले आहेत. गुंडांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्यचे दिसून येत आहे. आजच सकाळी कोथरूडमध्ये बंदूक घेऊन २ तरुण फिरत असल्याचे सीसीटीव्हीतून दिसून आले आहे. मागील काही दिवसांपुर्वी घायवळच्या गुंडांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केला होता. कोथरूडमध्ये वारंवार या घटना घडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं आणि तिथं एवढे चंद्रकांतदादा कोथरूडमध्ये करतात काय? असा सवाल धंगेकरांनी उपस्थित केला आहे.
धंगेकर म्हणाले, निलेश हा भारत सोडून पळून गेलेला आहे. त्याला पासपोर्ट कोणी दिला हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्या अधिकाऱ्यांनी पासपोर्ट दिला त्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्याला कुठल्या नेत्यांनी शिफारस दिली त्याची चौकशी झाली पाहिजे. जर गृहखात्याने मनापासनं काम करायचं ठरवलं. जर विरोधक कसं आपण विरोधकाला कसं करतो. त्या पद्धतीनं जर याची चौकशी झाली तर याच्यामध्ये ज्या ज्या राज्यकर्त्यांनी निलेश घायवळला पाठिंबा दिलाय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आज आपण बघितलं कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं आणि तिथं एवढे चंद्रकांतदादा म्हणून करतात काय? आमच्या सर्वसामान्य लोकांवर अटॅक करतात. तर गुन्हेगारांला का पाठीशी घालतात? हा प्रश्न मला नेहमीच पडतो. आता कळलं की, आज सकाळी कोथरूडमध्ये दोन गुन्हेगार बंदूक घेऊन जाताना सिसिटीव्ही समोर आला आहे. म्हणजे कोथरूड आणि गुन्हेगारी आता पुणेकरांना नवीन नाही आणि याच्यामध्ये जे पाठीशी घालतात ते राज्यकर्ते आहेत.