आंघोळीवरून भांडण, सासूने सूनेचा चावा घेतला…
By नितीश गोवंडे | Updated: December 21, 2024 16:51 IST2024-12-21T16:51:01+5:302024-12-21T16:51:28+5:30
पुणे : अंघोळीच्या कारणावरून सासू-सुनेमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला असून, या वादाच्या रागातून सासूने सुनेला मारहाण करत तिचा ...

आंघोळीवरून भांडण, सासूने सूनेचा चावा घेतला…
पुणे : अंघोळीच्या कारणावरून सासू-सुनेमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आला असून, या वादाच्या रागातून सासूने सुनेला मारहाण करत तिचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुनेने सहकारनगर पोलिस ठाण्यात सासूविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २०) सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी महिलेने तिच्या मुलाला शाळेत जायचे असल्याने अंघोळीला जाण्यास सांगितले. मात्र, यावेळी सासूने आपल्याला आधी अंघोळीला जायचे असल्याचे सांगितले.
फिर्यादी महिलेने मुलाला शाळेत जायची घाई असल्याचे सांगून त्याला अंघोळीसाठी बाथरूममध्ये पाठवले. यावर सासू चिडली आणि सुनेला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत सासूने सुनेच्या दंडाला, हाताच्या अंगठ्याला आणि मांडीला जोरात चावा घेतला.
याशिवाय, फिर्यादी महिला भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. व्यवसायानिमित्त त्यांना विविध लोकांशी बोलावे लागते. मात्र, सासू त्यांच्या या वर्तणुकीवरून वेगवेगळ्या लोकांशी संबंध असल्याचा संशय घेऊन वारंवार त्यांच्यावर आरोप करत असल्याचे आणि याच कारणावरून मारहाण करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहकारनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी शिवतरे करत आहेत.