पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन! गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 13:07 IST2021-05-26T13:06:55+5:302021-05-26T13:07:01+5:30
मार्केटयार्डमधील घटना, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने संपवले जीवन! गळफास घेऊन केली आत्महत्या
पुणे: सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मार्केटयार्डमधील प्रेमनगर वसाहतीत २४ मेला घडली.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी सागर मोहन कांबळे (वय २५, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केटयार्ड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दिपाली सागर कांबळे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या बहिणीने मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
दिपाली यांचा १८ सप्टेंबर २०२० पासून छळ सुरु होता. जेवण नीट बनवत नाही. आईकडे लक्ष देत नाही. माहेरच्या नातेवाईकांशी फोनवर बोलत असते, अशा वेगवेगळ्या कारणावरुन दीपाली यांचा वारंवार शारीरीक व मानसिक छळ केला जाता होता. सागर कांबळे याने मानसिक छळ करुन 'तू एकदाची मरत का नाहीस. म्हणजे मला तुझ्यापासून सुटका मिळेल', असे म्हणून दिपाली यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. सागर यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी २५ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.