बाप तो बापचं! ९ वर्षीय मुलावर बिबटयाचा हल्ला; वडिलांनी शेतात असलेल्या फावडीने मुलाला वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:46 IST2025-10-24T12:44:24+5:302025-10-24T12:46:20+5:30
वडिलांबरोबर शेतात फुले तोडण्यासाठी गेला होता. अचानक बिबट्याने हल्ला केल्यावर वडिलांच्या प्रसंगावधानामुळे शेतात असलेले फावडीने बिबट्याच्या तावडीतुन मुलाला सोडवले

बाप तो बापचं! ९ वर्षीय मुलावर बिबटयाचा हल्ला; वडिलांनी शेतात असलेल्या फावडीने मुलाला वाचवले
राजगुरूनगर: रेटवडी ( ता खेड ) येथे वडिलांबरोबर शेतात गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला, पण वडिलांच्या प्रसंगावधानामुळे मुलाचा जीव वाचला.या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि वन विभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
रेटवडी येथील कोल्हेवस्ती, सतारकावस्ती या परिसरात गेल्या चार महिन्यापासून तीन चार बिबट्याचा वावर आहे. गुरुवारी (दि. २३ रोजी ) दुपारी शेतात स्वराज दत्तात्रय जाधव हा वडिलांबरोबर शेतात फुले तोडण्यासाठी गेला होता. अचानक बिबट्याने हल्ला केला. वडिलांच्या प्रसंगावधानामुळे शेतात असलेले फावडीने बिबट्याच्या तावडीतुन मुलाला सोडवले. स्वराजचा मानेवर ,गळ्यावर खोलवर गंभीर जखमा झाल्या आहे. तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात मुलाला हलवण्यात आले. पुढील उपचाराचा साठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेटवडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याने ग्रामस्थांना व शाळेतील मुलांना शाळेत जा -ये करण्यासाठी भीतीचे वातावरण तयार झाले आहे. बिबटे शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करत आहे. बिबट्यांच्या बंदोबस्त करावा असे वन विभागाला कित्येक वेळा परिसरातील ग्रामस्थांनी सांगितलेले असताना सुद्धा वन विभागाने याकडे दुर्लक्ष दिल्याने ग्रामस्थाचा वन विभागाच्या विरोधात रोष दिसून येत आहे.