कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, नऊ जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 14:02 IST2026-02-26T14:01:26+5:302026-02-26T14:02:01+5:30
घटनास्थळावरून शर्थीचे प्रयत्न करून सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथे दाखल करण्यात आले

कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, नऊ जण गंभीर जखमी
वडगाव आनंद (जुन्नर) : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आणे येथे पिकअप व बोलोरो या दोन वाहनांच्या भीषण अपघातात एक ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी रात्री २५ फेब्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप (एमएच १६ डीपी ०१०३) अहिल्यानगर जिल्ह्यातील नांदूर पठार या ठिकाणाहून कलिंगड भरून मुंबई या ठिकाणी जात होता.
बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्याच्या हद्दीतील आणे गावाजवळ आल्यानंतर आळेफाटाकडुन येत असलेल्या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांच्या अपघाताचा मोठा आवाज झाला, त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. रुग्णवाहिकांना संपर्क साधून रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. शर्थीचे प्रयत्न करून सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथे दाखल करण्यात आले. रात्रीच्या सुमारास नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली होती.
मालवाहतूक पीकअप गाडीमधील कलिंगड महामार्गावर पसरली तर ये-जा करणाऱ्या वाहनांच्या खाली गेलेली पाहायला मिळले. या कलिंगडाचा रस्त्यावर राडारोडा झाला. दरम्यान या दोन्हीही वाहनांमध्ये एकुन दहा जण बसलेले होते. यामध्ये सचिन सकारू पठारे, सुभाष पोपट दुधावडे, किरण नारायण खंडागळे, सुनील भिकाजी केदार, अशोक दिलीप मढे, संपत गंगाराम पठारे, सुनील काळे, दत्तू डोके, नामदेव मढे हे सर्व जण जखमी झाले, तर तुकाराम पोपट मधे (वय ५५, रा. अकलापुर) यांचे आळेफाटा या ठिकाणी उपचार चालु असताना मुत्यू झाला आहे.