मोटू-पतलूचे पात्र शिकवणार कर साक्षरतेचे धडे; कॉमिक पुस्तकांची अनोखी मालिका प्रकाशित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 09:46 IST2025-11-01T09:45:46+5:302025-11-01T09:46:46+5:30
एकूण आठ कॉमिक्सचा हा संच इंग्रजी, हिंदी, गुजराती, तेलगू आणि तामिळ या पाच भाषांमध्ये उपलब्ध आहे

मोटू-पतलूचे पात्र शिकवणार कर साक्षरतेचे धडे; कॉमिक पुस्तकांची अनोखी मालिका प्रकाशित
उजमा शेख
पुणे : मुलांना लहानपणापासूनच आर्थिक जबाबदारी आणि नागरिकत्वाची जाणीव करून देण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि प्राप्तिकर विभागाने एक अनोखा आणि सर्जनशील उपक्रम हाती घेतला आहे. 'मोटू-पतलू' या लोकप्रिय कार्टून पात्रांच्या माध्यमातून कर साक्षरतेचे धडे देणारी कॉमिक पुस्तकांची मालिका प्रकाशित करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा उद्देश मुलांना मनोरंजनासोबतच शिक्षण देणे असा असून, 'मोटू-पतलू आणि टॅक्स परी', 'मोटू-पतलू आणि पॅन कार्डची कहाणी', 'मोटू-पतलू आणि भीतीवर विजय !' अशा मजेशीर कथांद्वारे कर भरण्याचे महत्त्व, कायद्याचे पालन, जबाबदार नागरिकत्व आणि देशाच्या विकासात कराची भूमिका याबद्दल सोप्या भाषेत माहिती दिली आहे. ही कॉमिक मालिका 'आझादी का अमृत महोत्सव' या उपक्रमांतर्गत तयार केली असून, प्राप्तिकर संचालनालयाच्या जनसंपर्क, प्रकाशन व प्रसिद्धी संचालनालयाने ती ऑनलाईन प्रकाशित केली आहे. एकूण आठ कॉमिक्सचा हा संच इंग्रजी, हिंदी, गुजराती, तेलगू आणि तामिळ या पाच भाषांमध्ये उपलब्ध आहे. या कॉमिक्सच्या माध्यमातून मुलांना कर भरण्याचे सामाजिक आणि राष्ट्रीय महत्त्व समजावले जात आहे.
संपूर्ण कॉमिक्स मालिका विनामूल्य
कर साक्षरतेचा हा उपक्रम देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरत असून, पालक व शिक्षकांकडून याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ही संपूर्ण कॉमिक्स मालिका विनामूल्य डाउनलोडसाठी https://incometaxindia.gov.in/Pages/comic-books.aspx अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सीबीएसईने देशातील सर्व संलग्न शाळांना ही कॉमिक मालिका विद्यार्थी, शिक्षक व पालकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.