पुरंदर विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक; पोलिसांचा लाठीचार्ज, एका वृद्ध महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 19:29 IST2025-05-03T19:28:31+5:302025-05-03T19:29:04+5:30
आंदोलने उपोषणे करूनही प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. आता आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली

पुरंदर विमानतळ विरोधात शेतकरी आक्रमक; पोलिसांचा लाठीचार्ज, एका वृद्ध महिलेचा मृत्यू
पुणे : पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून २ हजार ६७३ हेक्टर इतके भूसंपादन करण्यात येणार आहे. याविरोधात सात गावांतील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सात गावांत होणाऱ्या भूसंपादनापैकी एखतपूर या गावातील जमिनींच्या संपादनासाठीचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र, या सर्वेक्षणाला ग्रामस्थांना विरोध दर्शवीत काल ड्रोनच फोडल्याचे समोर आले आहे. तर आज जमिनी मोजण्यासाठी आलेल्या पथकाला गावात जाण्यासाठी ग्रामस्थांनी अडवणूक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या धक्काबुक्कीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. अंजनाबाई कामठे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे.
ड्रोन सर्वेक्षण आणि जमीन मोजणी थांबवावी, अन्यथा शेतकरी आपले जीवन थांबवतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. मात्र कालपासून ड्रोन सर्वेक्षण सुरु झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज आलेल्या सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. यावेळी पोलिसांकडून आमच्यावर लाठीचार्ज झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आमच्यावर गुन्हे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले आहे. याआधी अनेक आंदोलने उपोषणे करूनही प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. आता आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
ग्रामस्थांनी ड्रोन फोडले
विमानतळासाठीपुरंदर तालुक्यातील सात गावांपैकी एखतपूर या गावांत शुक्रवारी ड्रोन सर्व्हेला सुरुवात झाली होती. मात्र, ड्रोन सर्वेक्षण सुरू होत असताना स्थानिक शेतकऱ्यांच्या जमावाने ड्रोन फोडले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन दुपारी चार वाजेनंतर आणखी दोन ड्रोन कॅमेरे मागवून घेतले. त्याद्वारे पुन्हा ड्रोन सर्वेक्षण सुरू करून सायंकाळी ते सर्वेक्षण पूर्ण करण्यात आला. शेतकऱ्यांनी ड्रोन कॅमेरा फोडल्याने त्यांच्याविरोधात पोलिस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली होती.
हजारो लोकांचे संस्कार उद्ध्वस्त होणार
पुरंदर विमानतळ झाल्यास ते आमच्या प्रेतावरून होईल. शेतकरी विमानतळाला जमीन देणार नाहीत, हा आमचा निर्धार आहे. हा निर्धार पक्का असून, यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या विमानतळामुळे हजारो लोकांचे संस्कार उद्ध्वस्त होणार आहेत. जिल्ह्यात अनेक जागा उपलब्ध असून, तिथे विमानतळ करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.